ठाणे : मुंबई - नाशिक महामार्गावरील दरीत झाडाझुडपांमध्ये पडलेल्या एका कारमधून तीन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना शहापूर तालुक्यातील उंबरमाळी परिसरातुन जाणाऱया मुंबई - नाशिक महामार्गावर घडली आहे. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
मृत मुंबईतील रहिवासी : दाट झाडीमुळे कार लपलेली असल्याने याकडे दुर्लक्ष झाले असल्याचा अंदाज आहे. ही कार अंदाजे चार ते पाच दिवसांपूर्वी अपघातग्रस्त झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. यज्ञेश वाघेला (खार, मुंबई), प्रवीण कुमार सिंग (पवई) आणि राजबल्ली शेख (कुर्ला) अशी मृत तरुणांची नावे असून हे तिघेही जवळचे मित्र होते, अशी माहिती कसारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांनी दिली आहे.
घटना कशी आली उघडकीस? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील उंबरमाळी गावातील एक महिला गुरे चारण्यासाठी शेजारच्या भागात गेली असता, मुंबई - नाशिक महार्गावरील खोल दरीच्या परिसरात झाडाझुडपांमध्ये पडलेली कार गुरुवारी सायंकाळच्या सुमारास तिला दिसली. ती महिला कारजवळ गेल्यावर तिला दुर्गंधी जाणवली. तत्काळ तिने गावकऱ्यांना बोलावले व कसारा पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. कारची पाहणी केली असता तिच्यात तीन मृतदेह आढळून आले. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होते. प्राथमिक तपासात ही कार मुंबईतील अंधेरी, खार परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. मृतक तिघेही जवळचे मित्र असून २ जूनच्या रात्री मुंबईहून कारने त्र्यंबकेश्वरकडे निघाले होते. विशेष म्हणजे कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या मृत यज्ञेशने त्याच्या कुटुंबाला या प्रवासाची माहिती दिली होती. इतर दोघांनी त्यांच्या कुटुंबियांना सांगितले होते की ते रात्री उशिरापर्यंत परत येतील, असे सांगून घराबाहेर पडले होते. मात्र, जेव्हा ते परतले नाहीत, तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी अनुक्रमे खार, विनोबा भावे आणि पवई या तिन्ही पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रारी दाखल केल्या होत्या.
कारवरील नियंत्रण सुटले : पोलीस अधिकारी सुरेश गावित यांनी सांगितले की, "आम्हाला असा अंदाज आहे की, कारचे नियंत्रण सुटले आणि महामार्गावरून थेट दरीत आदळली. दाट झाडी आणि दुर्गम ठिकाणामुळे याकडे दुर्लक्ष झाले," त्यांनी असेही म्हटले आहे की, "हे तिघे तरुण त्र्यंबकेश्वर भागात पावसाळ्याच्या सुरुवातीचा आनंद घेण्यासाठी प्रवास करत असावेत. मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी आणि कोणत्याही गैरप्रकाराची शक्यता नाकारण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाची प्राथमिक तपासणी केली आहे. कार रस्त्यावरून कशी उलटले आणि दरीत कशी गेली हे शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे."
हेही वाचा -