सातारा : बीएसएफ जवान प्रियांका चव्हाण यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या कांगो (आफ्रिका) येथील शांतता मोहिमेसाठी निवड झाली आहे. कराड तालुक्यातील साकुर्डी गाव हे त्यांचं सासर आहे. आपल्या गावची सुनबाई शांतता मोहिमेत प्रतिनिधित्व करतेय, याचा संपूर्ण गावाला अभिमान वाटतोय.
माहेरकडून मिळाला देश सेवेचा वारसा : नेवरी (ता. कडेगाव, जि. सांगली) हे प्रियांका चव्हाण यांचं माहेर आहे. त्यांचे चुलत आजोबा हवाई दलात होते, तर चुलत आत्या सध्या आर्मीमध्ये कॅप्टन आहे. त्यामुळे देश सेवेचा वारसा त्यांना कुटुंबातूनच मिळाला. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नेवरी गावातच झालं. विटा येथे बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्या बहादूरवाडी (जि. सांगली) येथे भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी अकॅडमीत दाखल झाल्या. २०१२ साली त्या बीएसएफमध्ये भरती झाल्या.
लग्नानंतर सासरच्यांनी दिलं प्रोत्साहन : बीएसएफमध्ये भरती झाल्यानंतर प्रियांका यांचं कराड तालुक्यातील साकुर्डी गावातील नीलेश चव्हाण यांच्याशी लग्न झालं. त्यांचे पती शेती आणि फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतात. 'चूल अन् मूल' या चौकटीत न अडकवता सासरच्या लोकांनी त्यांना पाठिंबा आणि प्रोत्साहन दिलं. पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करायला लावलं. त्यांना दोन मुली आहेत. पती आणि सासू-सासरे मुलांचा सांभाळ करतात. त्यामुळे त्या निर्धास्तपणे सीमेवर आपलं कर्तव्य बजावतात.

- "युनोच्या शांतीसेनेत महिला जवानाची निवड होणे खूप अभिमानास्पद आहे. अर्थिक आणि राजकीय अस्थिरता असणाऱ्या देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करावं लागतं. शांतीसेनेतील काम, हा त्यांच्या करिअरमधील मोठा अनुभव असणार आहे. तसंच सैन्य दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरूणींसाठी सुद्धा त्यांची निवड प्रेरणादायी ठरणार आहे." - कॅप्टन (नि.) इंद्रजित जाधव, उंब्रज - कराड

सीमेवरून थेट शांतीसेनेत : शांतता मोहिमेत केवळ बळाचा वापर करून शांतता प्रस्थापित करायची नसते, तर आपली सम्यक वृत्ती, शिस्त, जबाबदारी, मानवी जीवनासाठी आदर आणि त्याचा मानसन्मान या गुणांचा वापर करावा लागतो. धाडस, कर्तव्यदक्षता, झोकून देऊन काम करण्याचा स्वभाव, दूरदृष्टी, नियोजन आणि कामामध्ये स्वतःचा संपूर्ण सहभाग यासारख्या गुणांच्या बळावर प्रियांका चव्हाण यांची युनोच्या आंतरराष्ट्रीय शांती सैन्यामध्ये निवड झाली आहे. या निवडीपुर्वी त्या जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवर कार्यरत होत्या.
हेही वाचा - मुंबई त्रिशक्ती महिला खलाशी मोहीम फत्ते; भाच्याला पाहून मामीचे पाणावले डोळे