अकोला : जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पोपटखेड रोडवरील एका बंद कारखान्यात एका व्यावसायिकाची हत्या करण्यात आल्याची घटना आज ८ एप्रिल रोजी उघकीस आली. या हत्येसंदर्भात पोलिसांनी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रमण चांडक असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पैशांच्या देवाण घेवाणीतून ही हत्या झाल्याचे कारण समोर येत आहे.
डोके ठेचून खून - पोपटखेड रोडवरील दहिखेल खुटकर शेत शिवारात विदर्भ बोन मिल बंद अवस्थेत आहे. या ठिकाणी एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारावर अकोट ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये मृतकाचा गळा आवळून दगडावर डोके ठेचून खून करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. या घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी मृतकाच्या कपड्यांची तपासणी केली असता त्यावरून रमण चांडक असे त्या व्यक्तीचे नाव समोर आले. रमण चांडक हे व्यावसायिक आहेत. त्यांचे मूळ गाव अकोट तालुक्यातील पणज असून ते सध्या अकोल्यातील गिता नगरामध्ये परिवारासह राहतात.
आर्थिक व्यवहारावरून वाद - रमण चांडक यांचा ऍटो डिटेलींगचा व्यवसाय आहे. त्यांचा व्यवहार हा गजानन रेडे यांच्याशी असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यांनी त्यांच्यासोबत अनेकवेळा व्यवहार केला आहे. त्यासोबतच त्यांचे अलिकडच्या काळामध्ये काही लोकांशी आर्थिक व्यवहारावरून वाद सुरू होता. या वादातूनच यांचा गळा आवळून त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार पोलिसांनी गजानन रेडे यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
हत्येचा गुन्हा दाखल - पोलिसांनी रमण चांडक यांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना आणले होते. त्यांनी त्यांची ओळख पटवली आहे. रमण चांडक यांचा मृतदेह हा शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शव विच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येमध्ये आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा...