मुंबई : मुंबईकरांना विविध सेवा सुविधा देण्याचं काम बृहन्मुंबई महानगरपालिकेचं आहे. यात आरोग्य सेवा आणि सुविधा देखील येत असतात. मुंबईकरांना दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा देता याव्यात यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं 320 कोटी रुपये खर्च करून बोरिवलीतील भगवती रुग्णालयाचं नूतनीकरण केलं. रुग्णालयाचं नूतनीकरण केल्यानंतर पालिका प्रशासनानं या रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घाट घातला आहे. त्यासाठी निविदा देखील मागवण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. मात्र, या सगळ्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेत्वातील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला असून, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेतली. त्यांनी या रुग्णालयाच्या खासगीकरण संदर्भात चर्चा केली. या रुग्णालयाचं खासगीकरण होऊ नये यासाठी काही करता येईल का याबाबत ही चर्चा करण्यात आली.
मागणीला सकारात्मक प्रतिसाद - ही चर्चा सकारात्मक झाल्याचं या बैठकीनंतर शिवसेनेच्या प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी पत्रकारांना सांगितलं. याप्रकरणी आयुक्तांनी आमच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं असून, भगवती रुग्णालय हे इथल्या नागरिकांसाठी महत्त्वाचं रुग्णालय आहे. आजूबाजूच्या परिसरातून अनेक आदिवासी बांधव येथे उपचार घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे या रुग्णालयाचं खासगीकरण केल्यास या नागरिकांना उपचार घेणं कठीण होईल. त्यामुळे या रुग्णालयाचं पालिका प्रशासनानं खासगीकरण करू नये यासाठी महाविकास आघाडीतर्फे निवेदन दिलं. ही माहितीही अंबादास दानवे यांनी दिली आहे. या बैठकीला शिवसेना ठाकरे पक्षाच्या आमदारांसह माजी नगरसेवक आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.
हेही वाचा..
शिवसेना एकच पक्ष, बाकीचे सगळे गद्दार; एसंशिंचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
आता सिलिंडर आम्ही पुरवू, तुम्ही फक्त रस्त्यावर बसायला या, संजय राऊतांचा स्मृती इराणींना टोला