ETV Bharat / state

वडील शेतामध्ये जाताना मुलाची झाली अखेरची भेट : कुलरचा शॉक लागून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

वडील शेतात गेल्यानंतर चिमुकल्याला कुलरचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील वडाळी इथं घडली.

Boy Died In Buldhana
संपादित छायाचित्र (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 20, 2025 at 2:31 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात एका बळीराजावर दुर्दैवी घटनाक्रम ओढवला आहे. घरुन निघताना चिमुकल्याला त्यांनी डोळे भरून पाहिलं. मात्र त्यानंतर शेतात जाऊन काम करत असताना थेट क्षणभर विश्वास बसणार नाही, असा निरोप त्यांना धाडला गेला. त्यामुळे या शेतकऱ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या चिमुकल्या मुलाचा कुलरचा शॉक लागून दुर्दैवी अंत झाला. गौरव चेतन वक्टे असं कुलरचा शॉक लागून मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे.

Child Died In Buldhana
गौरव चेतन वक्टे (Reporter)

कुलरचा शॉक लागून चिमुकल्याचा अंत : बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा इथून जवळच असलेल्या वडाळीतील गौरव चेतन वक्टे या चार वर्षाच्या चिमुकल्याचा घरामध्ये खेळताना कुलरचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना 18 जून रोजी संध्याकाळी अंदाजे सहा ते सात वाजेच्या दरम्यान घडली. वडाळी इथल्या चेतन नारायण वक्टे हे शेतामध्ये कामानिमित्त गेले होते, तर गौरवची आई घरकाम करत होती. यावेळी गौरव घरामध्ये नित्यक्रमानं खेळताना तो नकळत कुलर जवळ गेला. कुलरमध्ये शॉक आल्यानं त्याला कुलरचा शॉक लागून तो जबरदस्त ओढला गेला. त्याला त्वरित नांदुरा इथल्या शासकीय रुग्णालयात नेलं असता, डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्याच्यावर वडाळी इथं अंतिम संस्कार करण्यात आले. कुणालाही दिसता क्षणी आपुलकीनं ओढ लावणारा, सदा हसतमुख चिमुकला गौरव असा चटकन निघून गेल्यानं सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.

कुलर वापरताना घ्या काळजी : उन्हाळ्याच्या दिवसात कुलरशिवाय दिवस काढणं शक्य होत नाही. मात्र कुलरचा शॉक लागून मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. यापासून कसं सावध राहावं, याबाबत अनेक सूचना संबंधित विभागाकडून जनजागृती पर दिल्या जातात. यामध्ये कुलर सुरू असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क येणार नाही, याची दक्षता घ्या.

  • कुलरमध्ये पाणी टाकताना विद्युत प्रवाह बंद करून घेणं आवश्यक असते.
  • कुलरमध्ये विद्युत प्रवाह घेतलेला आहे तिथली वायरची तपासणी करुन घेणं आवश्यक आहे.
  • घरामध्ये कुलर असल्यास त्याला लाकडी पाट्याचा आधार देणं गरजेचं आहे.
  • वेळोवेळी कुलरची तपासणी तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे की नाही हे तज्ज्ञ व्यक्तीकडून करुन घेणं गरजेचं आहे.

हेही वाचा :

  1. कुस्ती सरावानंतर १४ वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकनं मृत्यू, माणदेशावर शोककळा
  2. मुंबईत पुन्हा हिट अँड रनचा प्रकार, वडाळ्यात चार वर्षीय मुलाचा मृत्यू
  3. खेळण्याकरिता गेलेल्या मुलाचा खड्डयात पडून चिमुकल्याचा मृत्यू