मुंबई : दरवर्षी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात ईदची नमाज अदा करण्यासाठी परवानगी दिली जाते. मात्र, यंदा ती नाकारण्यात आल्यानं आयोजकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बकरी ईद निमित्त दक्षिण मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात नमाज अदा करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयानं राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व सांस्कृतिक विभागाचे सचिव आणि महापालिका उपायुक्तांनी यावर निर्णय घ्यावा, असा आदेश जारी केला आहे.
काय आहे याचिका? : उमर अब्दुल जब्बार गोपालीनी यांनी ॲड. बुरान बुखारी व ॲड. हुसेन शेख यांच्यामार्फत ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले व न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. तेव्हा ऑगस्ट क्रांती मैदानावर कार्यक्रमास परवानगी देण्याचे विशेष अधिकार सामाजिक न्याय, सांस्कृतिक विभागाचे सचिव व स्थानिक पालिका उपायुक्तांना आहेत. त्यामुळं याचिकाकर्त्यांनी त्यांच्याकडं अर्ज करावा आणि या अर्जावर तातडीनं निर्णय घ्यावा, असंही आदेशात नमूद करत उच्च न्यायालयानं ही याचिका निकाली काढली.
आयोजकांना शनिवारी किंवा रविवारी हवी परवानगी : रमाजान व बकरी ईदला नमाज अदा करण्यासाठी गेली 50 वर्षे ऑगस्ट क्रांती मैदानावर परवानगी दिली जात आहे. तिथं अगदी शांततेत, कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण न करता पंरपरेनुसार नमाज अदा केली जाते. दरम्यान, यावर्षी मात्र यासाठी आयोजकांना परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र ही परवानगी नाकारताना कोणतंही ठोस कारण दिलं गेलं नाही. जे चुकीचं असल्यानं शनिवारी किंवा रविवारी या मैदानावर नमाज अदा करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या याचिकेतून उच्च न्यायालयाकडं करण्यात आली होती.
हेही वाचा :