मुंबई : मागील अनेक वर्षांपासून मुंबईतील नायर रुग्णालय मुंबईकरांना सेवा देत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या नायर दंत रुग्णालयाच्या या योगदानाची दखल अमेरिकेतील एका संस्थेने घेतलीय. अमेरिकेतील पिएरी फॉचर्ड अकॅडमी या संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या मानाच्या पुरस्कारानं पालिकेच्या नायर दंत रुग्णालयाचा गौरव करण्यात आलाय. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम दंत रुग्णालय या श्रेणीत हा पुरस्कार नायर रुग्णालयाला देण्यात आला. सोबतच आशियाई देशांमध्ये दंत वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल वर्ष २०२५ साठी डॉक्टर नीलम अंद्राडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सर्वोत्तम कामगिरी करणारे रुग्णालय : पिएरी फॉचर्ड अकॅडमीची स्थापना सन १९३६ मध्ये झाली. आधुनिक दंतशास्त्राचे जनक मानले जाणारे फ्रेंच दंतचिकित्सक पिएरी फॉचर्ड यांच्या स्मरणार्थ व विविध क्षेत्रांतील योगदानासाठी या अकॅडमीच्यावतीनं हे पुरस्कार दिले जातात. याबाबत पालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, पिएरी फॉचर्ड अकॅडमीमार्फत श्रीलंकेतील कोलंबो येथे दंत आरोग्याशी संबंधित विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम कामगिरी करणारे रुग्णालय म्हणून नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाचा सन्मान करण्यात आला. मुंबई पालिकेच्यावतीनं नायर दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर नीलम अंद्राडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला असल्याची माहिती पालिकेनं दिलीय.
दररोज अनेक रुग्ण घेतात उपचार : मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील मुंबई सेंट्रल स्थानकापासून जवळच असलेले नायर रुग्णालय व दंत महाविद्यालय हे देशातील सर्वात जुन्या दंत महाविद्यालयांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालय आहे. याची स्थापना सन १९३३ मध्ये करण्यात आली होती. सध्या या रुग्णालयात एकूण २५ रुग्णशय्या व ३०० दंत उपचार खुर्ची उपलब्ध असून, दररोज सरासरी १ हजार ते १ हजार २०० रुग्ण उपचार घेत असल्याचं पालिकेनं म्हटलंय. तर, वार्षिक सरासरी पाहता साडेतीन लाख रुग्ण दंत उपचारासाठी येथे येत असल्याची माहिती पालिकेनं दिलीय.
मागील ४६ वर्षांपासून रुग्णसेवेचं भाग्य : वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून १९८७ पासून नायर रुग्णालय दंत महाविद्यालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर नीलम अंद्राडे म्हणाल्या की, "रुग्णांसाठी समर्पण भावनेनं केलेल्या सेवेचा सन्मान या जीवनगौरव पुरस्कारानं झालाय. याचा मला अभिमान आहे. महानगरपालिकेची मी अत्यंत ऋणी आहे. या एकाच संस्थेत मी ४६ वर्षे सेवा केलीय. पूर्व शिक्षण संस्था या नात्यानं मला मिळालेलं शिक्षण, मुंबई महानगरपालिकेत मी बजावलेली सेवा तसंच प्रशासनाकडून मिळालेल्या पाठबळामुळं मी माझ्या व्यावसायिक, शैक्षणिक आणि प्रशासनिक सेवेमध्ये सन्मान प्राप्त करू शकले. मागील ४६ वर्षांपासून रुग्णसेवेचं भाग्य मिळालं, हे माझ्यासाठी गौरवाचं आहे", अशी प्रतिक्रिया डॉक्टर नीलम अंद्राडे यांनी दिलीय.
गुणवत्तापूर्ण सेवा देण्याची जबाबदारी वाढलीय : दुसरीकडं, यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनाही प्रतिक्रिया दिलीय. "पिएरी फॉचर्ड अकॅडमीसारख्या नावाजलेल्या संस्थेमार्फत झालेल्या सन्मानामुळं रुग्णांना अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याची जबाबदारी नायर रुग्णालयावर वाढलीय. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार सेवा पोहोचवाव्यात, यासाठी अधिक कटिबद्धपणे कार्य करण्यासाठी निश्चितच बळ मिळेल", असं आयुक्त भूषण गगराणी यांनी म्हटलंय.
हेही वाचा :