मुंबई : आहारात मीठ नसेल तर ते अन्न बेचव लागतं. परंतु, जेवणात मीठाचा जास्त वापर आरोग्यासाठी हानिकारक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, भारतीय लोक शिफारस केलेल्या 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ वापरतात. तर, मुंबईकर दररोज 9 ग्रॅम मीठ वापरतात. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या दैनंदिन आहारात मीठ आणि साखरेचे प्रमाण कमी करण्याबाबत माहिती देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने 'सॉल्ट ऍन्ड शुगर अवेअरनेस' म्हणजेच मीठ आणि साखर जागरूकता मोहीम सुरू केली आहे.
आयुक्तांच्या उपस्थितीत मोहिमेला सुरूवात : जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून महानगरपालिकेच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत 'मीठ आणि साखर जागरूकता' मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी 'मीठ आणि साखर जागरूकता' मोहिमेचे पोस्टर देखील प्रकाशित करण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान, भूषण गगराणी यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला मुंबईकरांच्या आहारातील दैनंदिन मीठाचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिलेत.
निरोगी सुरूवात, आशादायक भविष्य : यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाचं ब्रीदवाक्य ‘निरोगी सुरूवात, आशादायक भविष्य’ असे आहे. तर, महानगरपालिकेच्या अभियानाचे घोषवाक्य 'स्वस्थ रहा, मस्त रहा' असे असल्याचं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे सांगण्यात आलं. जागतिक आरोग्य संघटना आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संयुक्तपणे करण्यात आलेल्या स्टेप्स सर्व्हे 2021 नुसार, मुंबईतील नागरिकांमध्ये 34 टक्के उच्च रक्तदाब आणि 18 टक्के मधुमेहाचं प्रमाण आढळून आलं आहे. मीठ आणि साखर आपल्या अन्नामध्ये चवीसाठी वापरल्या जाणाऱ्या सामान्य घटकांपैकी एक आहे. मीठ आणि साखर यांच्या अतिवापरामुळं उच्च रक्तदाब, मधूमेह, हृदयविकार यासारखे गंभीर आजार होण्याचा धोका असतो. मुंबईकरांच्या मिठाच्या सेवनाचं प्रमाण कमी करणं गरजेचं असल्याचं पालिकेच्या आरोग्य विभागानं म्हटलं आहे.
यामुळं टाळता येतात 'हे' आजार : विविध देशात केलेल्या संशोधनाद्वारे असे आढळून आले की, बालपणापासूनच मीठाचा वापर कमी केल्यानं तरुण वयात उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकार इत्यादी आजार होण्याचा धोका कमी करता येतो. मे महिन्यात साजरा करण्यात येणाऱ्या मीठ आणि साखर जनजागृती अभियानाचा आठवड्याच्या निमित्तानं बृहन्मुंबई महानगरपालिका तसंच पार्टनरशीप फॉर हेल्दी सिटीज आणि अमेरिकेअर्स इंडिया फाऊंडेशन यांच्या सहकार्यानं 'मीठ व साखर जनजागृती' अभियान राबविण्यात येणार आहे.
मीठ, साखरेच्या अतिरिक्त सेवनाबाबत मोहीम : भविष्यातील पिढ्यांमध्ये असंसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी मीठ आणि साखरेच्या अतिरिक्त सेवनाबाबत जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. रोजच्या आहारात मीठ आणि साखरेचं प्रमाण कमी करण्याबाबत नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी व शाळांमध्ये अतिरिक्त मीठ आणि साखर याबाबत जनजागृती करून बालपणीच रोग्यदायी सवयी रुजवण्याचे महत्त्व सांगितलं जाईल, अशी प्रतिक्रिया पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपायुक्त डॉ. दक्षता शहा यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
हेही वाचा :