पुणे : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत. पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच पुणे महापालिकेत एका महिला अधिकाऱ्यानं भाजपा पदाधिकाऱ्याकडून छळ होत असल्याची तक्रार महिला आयोगाकडं केली आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्त अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी भाजपा पदाधिकारी ओंकार कदम आणि अक्षय कांबळे यांच्याविरोधात पत्रक काढून महापालिकेत प्रवेशबंदी केली आहे.
पुणे महानगरपालिकेतील एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यानं भाजपा पदाधिकारी ओंकार कदम यांच्यावर फेब्रुवारीपासून दमदाटी आणि छळ केल्याचा आरोप केला आहे. याबाबत महिलेनं आधीच महापालिका आयुक्तांकडं तक्रार केली होती, पण त्यांच्याकडून कोणतीही दाद मिळाली नाही. अखेर महिला अधिकाऱ्यानं थेट महिला आयोगाकडं तक्रार करत मदतीसाठी हाक दिली. प्रकरण महिला आयोगापर्यंत पोहोचताच महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी थेट पत्रक काढत ओंकार कदम आणि अक्षय कांबळे यांना महापालिकेत बंदी घातली आहे.
आयुक्त नवलकिशोर राम काय म्हणाले? - या घटनेबाबत महापालिका आयुक्त नवलकिशोर राम म्हणाले की, महापालिकेतील जेवढे अधिकारी कर्मचारी आहेत, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आयुक्त म्हणून माझी आहे. कोणीही महापालिका अधिकाऱ्यांना दमदाटी केली तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. या प्रकरणाशी संबंधित महिला अधिकारी या खूप सिनियर असून त्यांना जर त्रास दिला जात असेल तर ते चुकीचं आहे. एखादं काम होत नसेल तर त्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडं यावं, आता या प्रकरणी आम्ही कडक अॅक्शन घेतली असून संबंधित पदाधिकाऱ्याला महापालिकेत प्रवेश बंदी केली आहे.
जर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला असेल, तर त्यांच्यावरदेखील कारवाई होणार असल्याचं आयुक्त राम म्हणाले. तसंच, जर ओंकार कदम यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले, तर आम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करू आणि जर अधिकाऱ्यांचे आरोप खरे ठरले तर आम्ही पोलिसांत तक्रार देऊन त्यांच्यावर रितसर गुन्हा दाखल करू, असंही महापालिका आयुक्तांनी सांगितलं.
ओंकार कदम यांचं स्पष्टीकरण- यावर भाजपा पदाधिकारी ओंकार कदम यांनीही आपली बाजू मांडण्यााच प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की, महिला आयोगाकडे जी काही तक्रार दाखल करण्यात आली, त्याची चौकशी व्हावी. संबंधित महिला अधिकाऱ्यानं महापालिकेत भ्रष्टाचार केले आहेत, त्याबाबत मी महापालिका आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती आणि याचाच राग मनात धरून त्यांनी माझ्याविरोधात महिला आयोगाकडं तक्रार दाखल केली आहे. मी कधीही या महिलेला त्रास दिलेला नाही, त्यांनी जो काही एका रुग्णालयाच्या संदर्भात भ्रष्टाचार केला आहे, तो मी उघडकीस आणला आहे. या प्रकरणात जे काही सत्य असेल ते समोर आलं पाहिजे.
संपूर्ण प्रकरण फेब्रुवारीपासून सुरू - याबाबत अधिक माहिती अशी, की हा सगळा प्रकार फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होता. त्यावेळी तत्कालीन आयुक्त राजेश भोसले यांच्याकडे संबंधित महिला अधिकाऱ्यांनी कदम यांची तक्रार केली होती, पण त्यावेळी महापालिकेने कोणतीही दखल घेतली नाही. केवळ पोलिसांना एक गोपनीय पत्र देऊन याच संदर्भातली माहिती दिली होती. मात्र, आता या प्रकरणी संबंधित महिला अधिकाऱ्यांनं महिला आयोगाकडे धाव घेतल्यावर महापालिका आयुक्तांनी ओंकार कदम यांच्यावर महापालिकेत येण्यास बंदी घातली आहे.
हेही वाचा-