अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात भिक्षुकांच्या मृत्यूनंतर विरोधकांनी रान उठवण्यास सुरुवात केली आहे. भिक्षुकांच्या मृत्यू प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळंच झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. "भिक्षुकांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळं झाला? हे स्पष्ट करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करावं," अशी मागणी अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी केली. "प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं भिक्षुकांचा मृत्यू झालाय," असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरी जाधव यांनी केला.
भिक्षुक रूग्णायलातून पसार : शिर्डी प्रशासन दर दोन महिन्याला भिक्षुकांची धरपकड करण्याची मोहिम हाती घेते. या मोहिमे दरम्यान काही भिक्षुकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यापैकी काही भिक्षुकांना न्यायालयाच्या आदेशानंतर विसापूर इथल्या निवारागृहामध्ये ठेवण्यात आलं होतं. दरम्यान निवारागृहामध्ये यापैकी दहा भिक्षुकांची प्रकृती खालावल्यानं त्यांना उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यापैकी उपचारादरम्यान चार भिक्षुकांचा मृत्यू झाला. दोन भिक्षुकांवर उपचार सुरू आहेत. तर, यातील तीन भिक्षुक जिल्हा रुग्णालयातून पसार झाले आहेत.
युवा नेत्याच्या हट्टापायी भिक्षुकांचा बळी : खासदार निलेश लंकेंनी रात्री उशिरा उपचार घेत असलेल्या भिक्षुकांची जिल्हा रुग्णालयात भेट घेत त्यांची तब्येतीची विचारपूस केली. त्याचबरोबर प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर प्रश्न उपस्थित केले. यावेळी खासदार निलेश लंके यांनी नाव न घेता माजी खासदार सुजय विखेंवर निशाणा साधला. "एका युवा नेत्याच्या मागणीमुळं कधी नव्हे ती भिक्षुकांवर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबण्यात आलं. ही प्रशासनाची चूक आहे. मृत झालेल्या भिक्षुकांच्या मृतदेहांचे इन कॅमरा संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करून चौकशी करावी. या घटनेची जबाबदारी कोण घेणार?," असा सवाल खासदार लंके यांनी उपस्थित केला.
शिर्डी नेमकी विखेंची की साईंची, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्याचा विखेवर आरोप : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी जिल्हा रुग्णालयावर गंभीर आरोप केलेत. "शिर्डी ही नेमकी विखेंची की साईबाबांची?" असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. "शिर्डीत अनेक भाविक प्रसादाचा लाभ घेतात. अशात थोड्या लोकांनी अन्नछत्राचा लाभ घेतला तर, कुठं बिघडलं. अन्नछत्र साई दरबार येणाऱ्या भक्तांच्या देणगीतून चालवला जातो, विखेंच्या पैशातून नाही. जिल्हा रुग्णालयात पाच वर्षांपूर्वी जळीत कांड घडलं होतं, त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. तर या मृत्यूचा अहवाल कधी येणार?" असा सवाल उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी केला.
हेही वाचा :