अहिल्यानगर : गेल्या काही महिन्यांपासून शिर्डीतील भिक्षेकऱ्यांचा प्रश्न चांगलाच चर्चेत आला आहे. शिर्डी प्रशासनाने दर दोन महिन्याला भिकारी धरपकड मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत भिक्षेकऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. याच कारवाईदरम्यान ज्या भिक्षेकरांना ताब्यात घेतलं होतं. त्यापैकी काही भिक्षेकरांना विसापूर येथील कारागृहामध्ये ठेवण्यात आलं होतं. तर उपचाराकरिता काही भिक्षेकऱ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यातील चार भिक्षेकऱ्यांचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं आहे.
रामनवमीच्या पार्श्वभूमीवर भिकारी धरपकड मोहीम : शिर्डीत भाविकांची नेहमीच गर्दी असते. भाविकांकडून दान धर्मात मिळालेल्या पैशांवर ते आपला उदरनिर्वाह करत असतात. तर काही भिक्षेकरी व्यसनाधीन देखील झालेले आहेत. शिर्डी पोलीस, नगरपरिषद आणि साईसंस्थान शिर्डीत दर दोन महिन्याला मुंबई भीक मागण्यास प्रतिबंध अधिनियम 1959 कलम 5 (5) कायद्यानुसार कारवाई करत असते. यात सापडलेल्या भिकाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार विसापूर येथील शासकीय भिक्षेकरी गृहात त्यांची रवानगी केली जाते. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर देखील ही मोहीम राबवण्यात आली असून यात पन्नासहून अधिक भिक्षेकर्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.
अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात भिक्षाकरांचे अतोनात हाल : आज जिल्हा रुग्णालयात आणलेल्या भिक्षेकरांपैकी एका भिक्षेकराने माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, शिर्डीमध्ये भंगार गोळा करताना आम्हाला ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर आम्हाला विसापूर मध्ये हलवलं. तिथून जिल्हा रुग्णालयात आणलं. आम्हाला एका खोलीत ठेवलं त्यानंतर आम्ही पाण्याची मागणी केली तरी कुणीही साधं पाणी देखील दिलं नाही, कुठलीही सेवा देण्यात आली नाही. तसेच विसापूर येथे मारहाण झाल्याची माहिती संबंधित भिक्षेकऱ्याने दिली.
रुग्णांना पूर्ण उपचार देण्याचा प्रयत्न : अहिल्यानगर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "विसापूर येथून आलेल्या रुग्णांची प्रकृती आणि त्यावेळेसच चिंताजनक होती. काहींना क्रोनिक अल्कोहोलिक सिम्पटम्ससह मनोविकारासारखे आजार होते. यामध्ये ज्या रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, त्यांना पूर्ण उपचार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्वी प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांना पुणे येथील ससून रुग्णालयात उपचाराकरिता पाठवण्यात येत आहे. परंतु या रुग्णांसोबत कोणीही नातेवाईक नसल्यानं ससून इथे या रुग्णांना भरती करून घेतले जात नाही. ते पुन्हा जिल्हा रुग्णालयात येतात. अल्कोहोलमध्ये विड्रॉल सिम्प्टम्समध्ये असल्यामुळं त्यांचे हातपाय सारखे हलत असतात. त्यामुळं उपचाराला अडचणी येतात. तसेच काही जण पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्यानं त्यांचे बोट बांधून ठेवले आहे."
नातेवाईकांकडून मृतदेह घेण्यास नकार : मृत्यू झालेल्या भिक्षेकऱ्यांपैकी एका भिक्षेकराच्या नातेवाईकांची ओळख पटली असून त्यास जिल्हा रुग्णालयात मृतदेह ताब्यात घेण्यासाठी बोलवलं असता, त्यांनी धक्कादायक खुलासा केला. आम्हाला कुठलीही पूर्वकल्पना न देता आज मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयाकडून कळवण्यात आलं. त्यानंतर आम्हाला संबंधित घटना येथे आल्यानंतर समजली. तरी इतर रुग्णांचे असे हाल होऊ नये, यासाठी तसेच संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर निलंबनासह कायदेशीर कारवाई होत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय नातेवाईकांनी केला आहे.
हेही वाचा -