मुंबई– जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आहे. या विमानतळाबाबतच्या अनेक बातम्या तुम्ही आजपर्यंत पाहिल्या असतील, वाचल्या असतील. इथे कधी तस्कर गांजा घेऊन येतात, सोनं घेऊन येतात, तर कधी ड्रग्स घेऊन येतात. तस्करी सोबतच हे विमानतळ कधी बॉम्ब हल्ल्याची धमकी, तर कधी विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या यांनी चर्चेत असतं. मात्र, आता हे विमानतळ एका वेगळ्याचं कारणाने चर्चेत आलंय ते म्हणजे मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे.
विमान मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी उड्डाणाच्या तयारीत : झालं असं की, अक्सा एअर या कंपनीचे विमान मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी उड्डाणाच्या तयारीत होते. विमानात प्रवासी बसले होते. तेवढ्यात विमानावर मधमाश्यांनी हल्ला चढवला. मधमाश्यांच्या हल्ल्यात प्रवासी जखमी झाले नसले तरी वाहतूक मात्र खोळंबली होती. मात्र क्विक रिस्पॉन्स टीमने तत्काळ कारवाई केल्याने धोका टळलाय.
मधमाश्यांनी काही वेळातच विमानाला घेराव घातला : मिळालेल्या माहितीनुसार, अक्सा एअर या कंपनीचे विमान A1 धावपट्टीवर थांबले होते. त्याचवेळी मधमाश्यांचा थवा विमानाजवळ येत असल्याचे काही प्रवाशांनी आणि विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी पाहिले. जमा झालेल्या मधमाश्यांनी काही वेळातच विमानाला घेराव घातला. मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे तत्काळ जलद गती कृती दलाला पाचारण करण्यात आले. या जवानांनी प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेत पर्यावरणपूरक पद्धतीने मधमाश्यांनादेखील कोणताही धोका न पोहोचवता या सर्व मधमाश्यांना विमानापासून हटवले.
विमान वाहतुकीचे वेळापत्रक काही काळ बिघडले : अचानक झालेल्या या मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे विमान वाहतुकीचे वेळापत्रक काही काळ बिघडले होते. मधमाश्यांना हटवल्यानंतर विमान टेक्निकल टीमने विमानाच्या सुरक्षेची आणि तांत्रिक पाहणी केली. त्यानंतर हे विमान दिल्लीसाठी रवाना करण्यात आले. "या मधमाश्या कशा आणि कुठून आल्या? हवामानातील बदल, विमानांचा आवाज आणि प्रकाशातील बदल यामुळे या मधमाश्यांचा हल्ला झाला आहे का? या सर्व बाबींची सध्या चौकशी सुरू असल्याचे विमानतळ प्रशासनाने म्हटलंय. सदर घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी देखील उपाययोजना करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया विमानतळ प्रशासनाने दिलीय.
हेही वाचाः
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकन न्यायालयाची परवानगी; आता राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा