बीड - सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात चर्चा झालेल्या बीडमधील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत चालला आहे. माजलगाव येथे भाजपा कार्यकर्त्याची भर दुपारी निर्घृण हत्या करण्यात आली आहे. धारदार शस्त्रानं सपासप वार करत तरुणाला जागेवरच संपवण्यात आलं आहे. या घटनेमुळे बीडमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे.
माजलगाव शहर पोलिसांनी मारेकऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी दिली आहे. मात्र, या घटनेमुळे बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
भाजपा कार्यालयाच्या जवळ घडला गुन्हा- माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या भाजपा कार्यालयासमोर मंगळवारी (15 एप्रिल) भरदिवसा तरुणाची हत्या करण्यात आली. बाबासाहेब प्रभाकर आगे (रा. किट्टी आडगाव) असे भाजपा कार्यकर्त्याचं नाव आहे. आरोपी नारायण शंकर फपाळ यानं ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हत्येनंतर आरोपी स्वतःहून थेट शहर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही घटना भाजपा कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतराजवळ घडली आहे. बाबासाहेब आगे हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे. हत्या झाल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाबासाहेबच्या मृतदेहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये आरोपीदेखील दिसत आहे.
आरोपी स्वत:हून पोलिसांना शरण- मिळालेल्या माहितीनुसार आरोपीच्या पत्नीसोबत बाबासाहेब आगे याचे अनैतिक संबंध होते. वेळोवेळी सांगून आणि समज देऊनही आगे ऐकत नसल्यानं आरोपी दोन महिन्यापासून त्याच्या मागावर होता. दरम्यान मंगळवारी आरोपी नारायण फपाळ आणि बाबासाहेब आगे समोरासमोर आले. नारायण यानं कोयत्यानं बाबासाहेबवर सपासप वार करत जागेवरच संपवले. यानंतर आरोपी हा स्वतः पोलीस स्टेशनला हजर झाला आहे.
हेही वाचा-