बारामती : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून कर्जबाजारी झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं सरकारकडून सांगितलं जातयं. पण, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबत नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यामागं खासगी सावकारांचा तगादा हे मोठे कारण आहे. सरकारनं कर्जमाफी केली तरी, बँकांच्या कर्जाची माफी होते. मात्र, खासगी सावकार आणि पतसंस्था यांची कर्जमाफी होत नाही. त्यामुळं शेतकरी आज खासगी सावकार आणि पतसंस्थांच्या जाळ्यामध्ये अडकला आहे.
बारामतीत कर्जदारांनीच घेतला सावकाराचा बळी : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी इथल्या सावकारालाच कर्जदार शेतकऱ्यांनी कायमचा संपवलाय. 15 लाख रुपये परत मिळवण्यासाठी या सावकारानं तगादा लावला होता. यातूनच या सावकाराचा खून करण्यात आला. यानंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. अशा प्रकारे कोणी खाजगी सावकार तुम्हाला त्रास देत असेल तर, पोलीस प्रशासनाकडं तक्रार नोंदवण्याचं आवाहन आता पोलिसांनी केलं आहे.
काय आहे सावकार प्रकरण ? : बारामती तालुक्यातील रोहित गाडेकर हा एक सावकारी व्यवसाय करणारा व्यक्ती सोरटेवाडी गावातील रहिवासी होता. त्याच्याच गावातील अमोल वसंत माने, सागर वसंत माने आणि विक्रम काकासो मासाळ यांना सावकारानं व्याजानं पैसे दिले होते. मागील काही वर्षांपासून हे लोक त्याला पैसे देत होते. हा सावकार कर्जदाराला मारहाण करत असे. चारचौघात अपमानित करत असे. यातूनच या तिघांनी चिडून या सावकाराला संपवण्याचा कट रचला. पाच एप्रिलला रात्री अकरा वाजता या सावकाराला पैसे देतो असं सांगून एका निर्जन स्थळी बोलून घेतलं. यावेळी त्यांनी सावकारावर धारदार शास्त्रानं वार करून त्याचा खून केला. यानंतर याप्रकरणी अमोल माने आणि सागर माने या दोघांच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. खून केल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. मात्र, या आरोपींना पोलिसांनी 24 तासाच्या आत जेरबंद केलं. यावेळी याच घटनेतील आणखी एका आरोपीलादेखील पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्याकडं चौकशी केली असता "रोहित गाडेकर हा त्यांना व्याजाच्या पैशासाठी त्रास देत होता. व्याजाच्या नावाखाली जास्तीचे पैसे त्यांच्याकडून घेत होता. त्यांना मारहाण करत होता. म्हणूनच आपण त्याचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली."
पोलीस प्रशासनाचे आवाहन : जर कोणी बेकायदेशीर खासगी सावकारकी करत असेल, लोकांना व्याजासाठी त्रास देत असेल तर, याबाबतची फिर्याद पोलिसांत द्यावी. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल," असं बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं. त्याचबरोबर खासगी सावकारांना न घाबरण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. यासह पोलिसांनी खासगी सावकारांनादेखील सज्जड दम दिलाय.
राज्यभरातील खासगी सावकारीला आळा घालण्यासाठी सरकारी धोरण आवश्यक : खासगी सावकारकीच्या जाचातून शेतकऱ्यांना सोडवण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केलं होतं. त्यानंतर कर्जाची उपलब्धता सोपी व्हावी, लोकांना तातडीने कर्ज मिळावं म्हणून वेगवेगळ्या नागरी पतसंस्था निर्माण झाल्या आहे. अडचणीत आलेला शेतकरी पुन्हा खासगी सावकाराच्या आश्रयाला गेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर, खासगी पतसंस्था आणि खासगी सावकार यांच्यावर नियंत्रण आणण्याचा मोठं आव्हान पोलिसांसमोर पर्यायानं सरकारसमोर आहे. यासाठी राज्य सरकारनं काही धोरणात्मक निर्णय घेण्याचीदेखील गरज आहे, असे प्रगतीशील शेतकरी सुधीर निगडे यांनी म्हटलंय.
हेही वाचा :