पुणे : भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर इथल्या बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडं जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. त्याचे क्राँक्रिटीकरण करावं, यासाठी सातत्यानं पाठपुरावा होऊनही या रस्त्याचे काम सुरु झालेलं नाही. या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. कडक उन्हात ३ तासांपासून खासदार सुप्रिया सुळे यांचं उपोषण सुरू आहे. अजूनही याची शासनाने याची दखल घेतलेली नाही.
"जिल्हाधिकाऱ्यांवर शासनाचा दबाव असून राज्याचे मुख्यमंत्री यांनी फोन करून त्यांना खाली जाऊ नका" असं सांगितल्याचं आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. "श्री क्षेत्र बनेश्वर हे आमच्या श्रद्धेचा विषय आहे. शांततेच्या मार्गानं जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे उपोषण सुरू ठेवणार" असं यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. या आंदोलनावेळी खासदार सुप्रिया सुळेंशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीनं बातचीत केली आहे.
तीन तासांपासून उपोषण सुरू : "आम्ही शिवभक्त आहोत. जोपर्यंत आम्हाला बनेश्वर मंदिराला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही. ७०० मीटर रस्त्यासाठी शासनाकडं पाठपुरावा करत आहोत. परंतु, सरकारनं अजून याची दखल घेतलेली नाही," अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली.
हिंदुत्व वादाच सरकार खोट : "जिल्हाधिकारी मागच्या दरवाज्यानं आमची भेट न घेता निघून गेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्र्यांनी सांगितलयं की, सुप्रिया सुळेंची भेट घ्यायची नाही. यासह जिल्हाधिकाऱ्यांना कार्यालयात बसू नये असंही त्यांना सांगण्यात आलंय. त्यामुळं जिल्हाधिकारी निघून गेलेत. यातून या सरकारच्या खोट्या भूमिका समोर येत आहेत. एका मंदिराच्या रस्त्यासाठी सुप्रिया सुळेंना रस्त्यावर बसावं लागत आहे. याचा अर्थ देवेंद्र फडवणवीसांच सरकार खोट आहे, हे यातून पुढं आलं आहे," अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली.
रस्ता दुरूस्त करण्याची लाखो शिवभक्तांची मागणी : "आम्ही रस्ता दुरूस्तीची मागणी कोणाच्या घरासाठी करत नाही. तर मंदिरासाठी करत आहोत. ७०० मीटर रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी लाखो शिवभक्तांनी केली आहे. या मंदिरात लहान, तरुणांसह ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिला ही दर्शनासाठी जातात. यासह मंदिरात विविध शाळांच्या सहली दर्शनासाठी येतात. त्यामुळं या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी आमची मागणी आहे, असं खासदार सुप्रिया सुळेंनी सांगितलं.
मी इथून हलणार नाही : "जोपर्यंत कामाची वर्क ऑर्डर निघत नाही, तोपर्यंत मी उपोषणावर ठाम राहणार आहे. सध्या ऊन वाढत चाललं आहे. मी अन्न खाणार नाही," असं म्हणत सुप्रिया सुळे भर उन्हात आंदोलन करण्यासाठी बसल्या आहेत. त्या डोक्यावर पदर घेऊन उन्हात उपोषण करत आहेत. "जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मी अन्नत्याग करेन," असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा :