युद्ध थांबल्यामुळं केळी उत्पादक शेतकऱ्यांना 'अच्छे दिन'; 2500 ते 2600 रुपये मिळतोय केळीला भाव
इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळं केळीचा दर गडगडला होता. परंतु युद्ध थांबल्यामुळं केळीला चांगला भाव मिळत आहे.

Published : July 11, 2025 at 11:46 AM IST
नांदेड : खाडी देशांत केळीची निर्यात सुरळीत झाली असून, अर्धापुरी केळीचा गोडवा वाढला आहे. मागील तीन आठवड्यांपूर्वी केळीला 1,100 ते 1,200 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. मात्र आता केळीला प्रति क्विंटल 2,500 ते 2,550 रुपये दर मिळत आहे. या युद्धाचा थेट परिणाम केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर झाला होता.
युद्धामुळं गडगडले होते केळीचे दर : अर्धापूर तालुका केळीपिकासाठी प्रसिद्ध असून, इथल्या शेतकऱ्यांचा आर्थिक कणा केळी हे पीक आहे. मात्र या वर्षी वादळी वाऱ्यामुळं केळीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. या संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांना केळीला चांगल्या दराची अपेक्षा होती. परंतु खाडी देशातील युद्धाचा परिणाम केळीच्या निर्यातीवर झाला होता. यामुळे केळीचे दर गडगडले होते.
कमी दरामुळं शेतकरी हवालदिल : परदेशात निर्यात थांबल्यामुळं केळीला कवडीमोल दर मिळत होता. लाखो रुपये खर्च केलेल्या केळीला कमी दर असल्यानं उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र इराण आणि इस्रायल या दोन देशांत युद्धविराम झाल्यानं केळी निर्यात होण्यास सुरुवात झाली. यानंतर निर्यात होणाऱ्या केळीला 2,500 ते 2550 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. तर दिल्ली, हरियाणा, पंजाब, चंडीगड, श्रीनगर इथं केळीला 2,000 ते 2,100 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. यामुळं पहिला चांगला दर मिळत आहे. एक्स्पोर्ट होणाऱ्या केळीला 2,500 ते 2,550 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. तर भारत देशांतर्गत अन्य राज्यात जाणाऱ्या केळीला 2,000 ते 2,100 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. तर स्थानिक ठिकाणी विकल्या जाणाऱ्या केळींना 1,700 ते 1,900 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.
युद्धामुळं केळीची निर्यात ठप्प : इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा फटका नांदेड जिल्ह्यात केळीला बसला होता. युद्धामुळं दररोज 100 टन केळीची निर्यात ठप्प झाली होती. दुसरीकडं आखाती देशातील दुबई आणि इराणमध्ये केळीची निर्यात केली जाते. 1,800 प्रतिक्विंटल दर मिळत होता. युद्धामुळं निर्यात थांबल्यानं शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेत कमी दरात केळीची विक्री करावी लागत होती. पण इराण आणि इस्रायलमधील युद्ध थांबल्यामुळं केळीला चांगला बाजार भाव मिळत आहे.
इथं होतं केळीचं सर्वाधिक उत्पादन : "राज्यात केळी उत्पादनात जळगावनंतर मराठवाड्यात नांदेड जिल्ह्याचा नंबर लागतो. नांदेडसह शेजारील हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील काही भाग असं मिळून जवळपास 15 हजार हेक्टर क्षेत्र केळी लागवडीचं आहे. यातून वर्षाकाठी जवळपास 7 लाख 50 हजार टन केळीचं उत्पादन होतं. जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर आणि मुदखेड तालुका या भागात प्रचंड प्रमाणात केळी पिकाची लागवड केली जाते. नांदेड जिल्हा हा निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. अर्धापूरची केळी महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. आफगाणिस्तान, तुर्कस्तान, इराण, दुबई या देशात येथील केळीची निर्यात होते. या सर्व भागातील केळीची व्यापारपेठ म्हणून नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर प्रसिद्ध आहे. सध्या केळीला दर चांगले मिळत आहेत. बाहेरच्या ठिकाणी 2,500 ते 2,600 रुपये क्विंटलला दर मिळत आहे. तर, स्थानिक बाजारपेठेत 2,200 ते 2,000 रुपये क्विंटलला दर मिळत आहे. जवळपास 100 टन केळी दररोज बाहेर देशात पाठवण्यात येते. इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळं निर्यात बंद झाली होती. आता तीच केळी इराक आणि दुबईमध्ये पाठवण्यात येत आहेत. तसंच सध्या आंब्याचे प्रमाण कमी झाल्यामुळं केळीला मागणी वाढली आहे. दरही पुढील काही दिवसांत अजून वाढतील," असं केळीचं व्यापारी नंदकिशोर देशमुख यांनी सांगितलं.
हेही वाचा :
- ठाण्यात 27 अवैध शाळा सील; विद्यार्थ्यांचं होणार वैध शाळांमध्ये समायोजन, शैक्षणिक वर्षाचं नुकसान होण्याची पालकांना भीती
- मुंबई शहर आणि लगत जमीन उपलब्धतेनुसार गिरणी कामगारांना घरे देणार, मंत्री उदय सामंत यांनी निवेदनाद्वारे दिली माहिती
- जनसुरक्षा विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर, कायद्याचा दुरुपयोग होणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

