अमरावती : राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं यासह राज्य शासनांना विविध गंभीर विषयांची दखल घेऊन नागरिकांच्या समस्या निकाली काढाव्यात यासाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आजपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. मोझरी येथे अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी बच्चू कडू यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह अमरावती शहरात ट्रॅकरवर स्वार होऊन मिरवणूक काढली.
संत गाडगेबाबा समाधी मंदिरातून निघाली मिरवणूक : बच्चू कडू यांनी रविवारी दुपारी शहरातील संत गाडगेबाबांच्या समाधीस्थळचं दर्शन घेतलं. यानंतर ते ट्रॅक्टर ट्रॉलीवर स्वार झाले. त्यांच्या ट्रॅक्टरमागे शेकडो कार्यकर्ते दुचाकीवर स्वार होऊन मिरवणुकीत सहभागी झाले. पंचवटी चौक, इर्वीन चौक, गर्ल्स हायस्कूल चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
काय आहेत मागण्या? : राज्यातील शेतकऱ्यांच कर्ज माफ करावं, दिव्यांगाना सहा हजार रुपये महिना मिळावे, यासोबतच शेतात पेरणी ते कापणीपर्यंत सर्व कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यांतर्गत व्हावी, मच्छीमार आणि मेंढपाळ आणि दूध उत्पादकांसाठी विशेष धोरण सरकारनं लागू करावं. यासोबतच ग्रामीण भागात घरकुलाची किंमत वाढून द्यावी अशा आमच्या मागण्या असल्याचं बच्चू कडू म्हणाले. शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा अन्नत्याग आंदोलनाच्या स्थळावरून अंत्ययात्रा निघेपर्यंत आपल्या भूमिकीवर ठाम राहू असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त : बच्चू कडू पुसदा गावात पोचल्यावर याठिकाणी त्यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनसोबत ते अमरावतीत संत गाडगेबाबा समाधी मंदिर येथे पोचले. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुसदा गावापासून अमरावती शहरापर्यंत पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला होता. संत गाडगेबाबा समाधी मंदिर परिसरात शेकडो पोलीस तैनात होते.
हेही वाचा -