अमरावती : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मुख्य मागणीसह एकूण 17 मागण्यांसाठी सात दिवसांपासून अन्नत्याग केलेल्या माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतलं. "सर्व मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही 2 ऑक्टोबर तारीख देतोय. 2 ऑक्टोबरपर्यंत आम्ही चांगलं खाऊन पिऊन तयार होऊ. गांधी जयंतीला भगतसिंह यांच्या मार्गानं मंत्रालयात शिरून आंदोलन करू," असं बच्चू कडू यांनी जाहीर केलय.
उदय सामंत यांनी आणलं शासनाचं पत्र : शेतमालाला किमान दरावर 20% अनुदान द्यावं. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना स्वतंत्र मंडळ स्थापन करून 10 लाखाची आर्थिक मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्यावी. धनगर समाजाचे आरक्षण तत्काळ लागू करा. धनगर समाजातील बेरोजगार तरुणांना नोकरीत 13 टक्के आरक्षण द्यावं. दिव्यांग आणि विधवा महिलांना 6000 रुपये मानधन द्यावं. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील घरकुलासाठीही समान निकष लागू करून किमान 5 लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना द्यावं. या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग केला होता. शनिवारी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडू यांच्या 25 पैकी 20 मागण्यांवर सरकार आठ दिवसात बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेईल असं पत्र बच्चू कडू यांना दिलं. "बच्चू कडू यांच्यासारख्या नेत्याची महाराष्ट्राला गरज आहे. त्यामुळं बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन मागं घ्यावं," अशी विनंती मंत्री उदय सामंत यांनी यावेळी केली.
जाती धर्माकडून सरकार वळलं शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर : "देशात आणि राज्यात जाती आणि धर्माच्या पलीकडं कुठल्याही विषयावर सरकार बोलायला तयार नाही. आमच्या आंदोलनामुळं पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या विषयावर निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडलं. हेच या आंदोलनाचं यश आहे," असं बच्चू कडू म्हणाले.
आता ऊर्जावान होऊ : "आमच्या मागण्या मान्य करण्याचं केवळ आश्वासन या सरकारनं दिलय. कोणत्या दिवशी या मागण्या मान्य होऊन निर्णय लागू होईल, हे स्पष्ट केलेलं नाही. सरकारनं तारीख दिली नसली तरी आम्ही मात्र 2 ऑक्टोबर ही तारीख सरकारला देत आहोत. आता गांधी जयंतीच्या दिवशी आम्ही भगतसिंगगिरी करू," असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
बच्चू कडू अजून जिवंत आहे : "उद्या राज्यभर आमचे कार्यकर्ते चक्काजाम आंदोलन करणार होते. मात्र आता आंदोलन रद्द केलय. मी स्वतः जलत्याग करणार होतो. मात्र आता शनिवारपासून आमचं आंदोलन काही दिवसांसाठी थांबवत आहे. नवी ऊर्जा घेऊन आम्ही पुन्हा मैदानात उतरू. या आंदोलनामुळं बच्चू कडू जिवंत आहे हे सरकारला ठाऊक झालं हेच या आंदोलनचं यश आहे," असं बच्चू म्हणाले.
हेही वाचा :