गोदावरी नदीच्या प्रवाहात रिक्षा वाहून गेली, चालकाचा मृत्यू; नागरिकांना सतर्कतेचं आवाहन
गोदावरी नदीच्या प्रवाहात रिक्षा वाहून गेल्याने चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर पूर ओसरल्यानं पंचवटी परिसरात जनजीवन पूर्ववत होत असून प्रशासनानं सतर्कतेचं आवाहन केलं.

Published : October 1, 2025 at 6:31 PM IST
नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळं नाशिकमध्ये गोदावरी नदीचा प्रवाह वाढला आहे. दरम्यान, नदीच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर मंगळवारी रात्री उशिरा एक रिक्षा वाहून गेली होती. ही घटना बुधवारी सकाळी समोर आली असून या घटनेत रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे.
अंदाज न आल्यामुळं रिक्षा कोसळली : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षा चालक शेख हमीद अजिज (वय 46) यांना गोदावरी नदीच्या पुलावरून रिक्षा घेऊन जात होते. यावेळी त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं टाळकोटेश्वर इथं त्यांची रिक्षा पाण्यात कोसळली. रात्रीची वेळ असल्यानं शेख यांना मदत मिळाली नाही. त्यामुळं ते रिक्षातच अडकले. यामुळं त्यांच्या मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी याची माहिती पोलिस आणि अग्निशामक दलाला दिली.
नदीकाठी जाणाऱ्यांनी सतर्क राहावं : अग्निशामक दलानं दोन तास शोध मोहीम करत शेख यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. पोलिसांनी शेख यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नदीच्या वाढत्या प्रवाहामुळं नागरिकांनी विशेषतः नदीकाठी जाणाऱ्यांनी सतर्क राहावं, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. मात्र या घटनेमुळं गोदावरी काठावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे
गोदावरीचा पूर ओसरला : नाशिक जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळं गंगापूर धरणातून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणत पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळं गोदावरी नदीला पूर आला होता. पुरामुळं पंचवटी परिसरातील गोदाकाठच्या दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून पाऊस थांबल्यानं गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवला आहे. त्यामुळं गोदावरी नदीचा पूर ओसरला आहे.
गोदाकाठचं जनजीवन पूर्ववत : तीन दिवसापूर्वी गोदावरी नदीला पूर आल्यानं पंचवटी रामकुंड परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं होतं. याचा फटका आजूबाजूच्या व्यवसायिकांना बसला होता. तसंच रामकुंड परिसरात धार्मिक विधीसाठी येणाऱ्या भाविकांना सुद्धा त्रास सहन करावा लागला होता. मात्र आता पूर ओसरल्यानंतर भाविकांची संख्या रामकुंड परिसरात वाढली असून जनजीवन पूर्ववत झालं आहे.
हेही वाचा

