गंगापूर (छत्रपती संभाजीनगर) : वैजापूर-गंगापूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांच्या शासकीय वाहनावर वाळूची अवैध वाहतूक करणारा हायवा घालण्याचा प्रयत्न झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास लासूर मार्गावर घडली. या प्रकरणी हायवा चालक, मालकासह चौघांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौघांविरोधात गुन्हा दाखल : वैजापूर गंगापूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांच्या शासकीय वाहनावर वाळूची अवैध वाहतूक करणारा हायवा घालण्याचा प्रयत्न झाला. यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा हायवा चालक, मालकासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महसूल विभागानं हायवा ताब्यात घेतला आहे.
हायवा चालकानं केला पुढं जाण्याचा प्रयत्न : वैजापूर गंगापूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्या शासकीय वाहनानं (एमएच २० जीओ ६८९८) गंगापूरहून लासूर स्टेशनकडं जात होते. यावेळी गंगापूर-लासूर मार्गावरून लासूर स्टेशनकडं अवैध वाळूची वाहतूक करणारा हायवा (एमएच २० जीसी ५७३५) जात असल्याचं डॉ. अरुण जऱ्हाड यांच्या लक्षात आलं. यानंतर त्यांनी हायवा चालकाला हात दाखवून थांबण्याचा इशारा केला. परंतु चालकानं हायवा न थांबवता पुढं जाण्याचा प्रयत्न केला.
हायवा गाडीवर घालतानाचा व्हिडिओ आला समोर : उपविभागीय महसूल अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांनी हायवा चालकाला थांबण्याचा इशारा केला. यानंतर हायवा चालकान वाहन न थांबवता वेगानं लासूर स्टेशनच्या दिशेनं पळवला. त्यानंतर डॉ. अरुण जऱ्हाड यांच्या चालकानं आपली गाडी पुढं घेऊन हायवा थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी हायवा चालकानं डॉ. अरुण जऱ्हाड यांच्या शासकीय गाडीवर आपलं वाहन घालण्याचा प्रयत्न केला. तब्बल दहा किलोमीटर पाठलाग केल्यानंतर मालुंजा इथल्या शिवना नदीच्या पुलावर वाहनाच्या गर्दीमुळं वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या हायवा चालकाला थांबावं लागलं. यावेळी डॉ. अरुण जऱ्हाड यांनी वाळूबाबत चालकाला माहिती विचारली असता, त्यांना हायवामधील वाळूची कोणतीही रॉयल्टी आढळून आली नाही.
हायवा महसूल विभागाच्या ताब्यात : उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांच्या तक्रारीवरून हायवा मालक आणि चालकासह चौघांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. तर महसूल विभागानं हायवा ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पुढील तपास सुरू : "महसूल पथकानं वाळूनं भरलेला हायवा गंगापूर पोलीस ठाण्यात जमा केला आहे. याप्रकरणी उपविभागीय महसूल अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांच्या फिर्यादीवरून 4 जणांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे," अशी माहिती गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे यांनी दिली.
हेही वाचा :