नवी मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील आळते (ता. हातकणंगले) येथील सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी मुख्य आरोपी आणि बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरसह साथीदार कुंदन भंडारी, महेश फळणीकर यांना पनवेल सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. दरम्यान, आज दोषी अधिकाऱ्यासह साथीदारांना न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे. यामध्ये मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर साथीदार कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर यांना सात वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
राज्याचं लागलं होतं या खटल्याकडे लक्ष : अश्विनी बिद्रे हत्याकांडाच्या निकालाकडे राज्यासह पोलीस दलाचं लक्ष लागलं होतं. पनवेल येथील सत्र न्यायालयानं सकाळी ११ वाजता या खटल्याचा निकाल दिला. पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रेचे अपहरण, हत्या, शरीराचे वूड कटरनं तुकडे करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी न्यायालयानं अभय कुरुंदकरला दोषी ठरविलं, तर साथीदार कुंदन भंडारी, महेश फळणीकर या दोघांना पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलं होतं.
...म्हणून दोन आरोपींची सुटका : अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला दोषी ठरवण्यात आलं होतं व त्याला आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसंच त्याला या खुनात साथ देणाऱ्या साथीदार कुंदन भंडारी व महेश फळणीकर या दोघांना पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. कुदंन भंडारी आणि महेश फळणीकर यांना कलम २०१ अन्वये सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, या दोघांनी तुरुंगात आधीच आपली शिक्षा पूर्ण केली असल्यानं त्यांची सुटका करण्यात येणार आहे.
काय आहे प्रकरण? : १५ एप्रिल २०१६ पासून अश्विनी बिद्रे-गोरे या नवी मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झाल्या होत्या. त्या बेपत्ता झाल्या नसून वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांनी बिद्रेंना बेपत्ता केल्याचा आरोप कुटुंबानं केला होता. या तपासात पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप सुरुवातीला अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला होता. अश्विनी बिद्रे २००० सालापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. २००५ साली त्यांचा विवाह हातकणंगले गावातील राजू गोरे यांच्यासोबत झाला. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि त्यांना पोलीस उपनिरिक्षक पद मिळालं होतं. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली इथं झाली. यावेळी त्यांची ओळख त्याच पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर याच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर २०१३ साली अश्विनी बिद्रे यांना प्रमोशन मिळाल्यानं त्या रत्नागिरीला आल्या. इथंही अभय कुरुंदकर अश्विनी बिद्रे यांना भेटण्यासाठी वारंवार येत होता. हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजलं होतं. त्यानंतर काही कालावधीनंतर अश्विनी बिद्रे-गोरे या बेपत्ता झाल्या आणि त्यांचा खून झाल्याचं अखेर उघड झालं. अभय कुरुंदकर याचा बालपणीचा मित्र महेश फळणीकर यानं अश्विनी यांच्या हत्येची कबुली दिली होती. धक्कादायक म्हणजे अश्विनी यांची हत्या करुन लाकूड कापण्याच्या मशीननं मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते आणि हे तुकडे वसईच्या खाडीत फेकून देण्यात आल्याचं फळणीकरनं सांगितलं होतं.
हेही वाचा :