मुंबई : राज्यात सोमवारपासून (16 जून) शैक्षणिक वर्ष पूर्ण होत आहे. या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी राज्य सरकार पुढं सरसावलं आहे. या दिवशी आपपल्या विभागातील खासदार, आमदार यांनी शासकीय शाळांमध्ये जाऊन शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करावं, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. याचाच एक भाग म्हणून शाळेच्या पहिल्या दिवशी आदिवासी विकास विभागातर्फे शासकीय आश्रमशाळा आणि अनुदानित आश्रमशाळांमध्ये 'विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव' साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

विद्यार्थ्यांशी लोकप्रतिनिधी साधणार संवाद : राज्यातील नाशिक, ठाणे, पालघर या ठिकाणी 16 जून रोजी शासकीय आश्रमशाळा सुरु होणार आहेत. तर अमरावती, नागपूर इथं 30 जूनला आश्रमशाळा सुरु होणार आहेत. दरम्यान, आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात एकूण 497 शासकीय आश्रमशाळा आहेत. तर अनुदानित आश्रमशाळा 554 आहेत. विशेष म्हणजे शाळेच्या पहिल्या दिवशी 'विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव' उपक्रमात मंत्री, खासदार, आमदार हे राज्यातील विविध आश्रमशाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच यावेळी विद्यार्थ्यांचं फूल देऊन स्वागत करण्यात येणार आहे.
आश्रमशाळांत शिक्षक आणि परिचारिका भरती : दरम्यान, पुढं बोलताना आदिवासी विकास मंत्री अशोक उईके म्हणाले की, "आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची भरती आगामी काळात करण्यात येणार आहे. विभागाच्या शासकीय आश्रमशाळांत 1791 शिक्षकांची पदं बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यास शासनानं मान्यता दिली आहे. तर यात उच्च माध्यमिक शिक्षक 229, माध्यमिक शिक्षक 455, पदवीधर प्राथमिक शिक्षक 120, प्राथमिक शिक्षक इंग्रजी 178, प्राथमिक शिक्षक मराठी 809 असे एकूण 1791 शिक्षक भरती लवकरच करण्यात येईल. तर परिचारिका (नर्सेस) यांची एकूण 499 पदांची बाह्यस्त्रोताद्वारे भरती केली जाणार आहे."
हेही वाचा :