मुंबई : सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात अनेक विधेयक मंजूर करण्यात आलीत. तसंच अनेक महत्वकांक्षी घोषणा देखील केल्या जाताहेत. दरम्यान, मुंबईतील वांद्रे (पू) येथे लवकरच ६६९१ चौ.मी. जागेवर राज्याचं नवीन 'महापुराभिलेख भवन' उभारण्यात येणार असल्याची घोषणा शुक्रवारी सांस्कृतीक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केलीय.
मुंबईतील मुख्यालयात १०.५ कोटी कागदपत्रं : आशिष शेलार यांनी ही घोषणा निवेदनाद्वारे केलीय. महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य विभागाचा पुराभिलेख संचालनालय हा विभाग असून, पुराभिलेख संचालनालयाची स्थापना १८२१ रोजी झाली होती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राज्याचं स्वतंत्र वस्तू संग्रहालय आणि कला भवन मुंबईतील बीकेसी येथे उभारण्यात येणार असल्याची घोषणा आशिष शेलार यांनी केली होती. यानंतर आज विधानसभेत 'महापुराभिलेख भवन' उभारण्यात येणार असल्याची आणखी एक मोठी घोषणा केलीय. सध्या पुराभिलेख विभागाकडं १७.५ कोटी कागदपत्रांपैकी १०.५ कोटी कागदपत्रं ही मुंबईतील मुख्यालयात असल्याची माहिती आशिष शेलारांनी दिलीय.
ऐतिहासिक कागदपत्रांचा संग्रह हा राष्ट्रीय ठेवा : सध्या महापुराभिलेखाचं मुख्यालय हे १८८९ पासून सर कावसजी रेडिमनी इमारत एल्फिस्टन कॉलेजच्या इमारतीमध्ये आहे. पुराभिलेखातील उपलब्ध असलेली दुर्मीळ आणि ऐतिहासिक कागदपत्रांचा संग्रह हा राष्ट्रीय ठेवा आहे. त्याचं जतन आणि संवर्धन करणं आवश्यक आहे. तसंच ही दुर्मीळ कागदपत्रं सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं नियंत्रित अभिलेख कक्ष, स्वतंत्र बांधणी शाखा, प्रतिचित्रण शाखा ह्या असणं गरजेच आहे. दरम्यान, देश-विदेशातून येणाऱ्या इतिहास संशोधकांसाठी अत्याधुनिक स्वतंत्र प्रदर्शन दालन, संशोधन कक्ष असं अद्यावत सुविधांनी सज्ज असलेलं हे 'महापुराभिलेख भवन' असणार आहे, अशी माहिती मंत्री आशिष शेलारांनी दिली.
हेही वाचा -