ETV Bharat / state

कपडे वाळत टाकण्यासाठी दोरी बांधताना शॉक लागून नागपूरच्या दोन वारकऱ्यांचा मृत्यू, आषाढी वारीवर शोककळा

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा फलटणमधील बरड येथे शॉक लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (29 जून) घडली.

Two Warkari Died due to Electric Shock
शॉक लागून नागपूरच्या दोन वारकऱ्यांचा मृत्यू (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 30, 2025 at 4:33 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

सातारा : आळंदीहून निघालेली माऊलींची पालखी रविवारी सातारा जिल्ह्यातील बरडमध्ये विसावली असताना कपडे वाळत टाकण्यासाठी दोरी बांधताना दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (29 जून) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. तुषार रामेश्वर बावनकुळे (रा. खलासना, नागपूर) आणि मधुकरराव तुकाराम शेंडे (रा. मेडिकल चौक, नागपूर), अशी मृत वारकऱ्यांची नावे आहेत.



नेमकं काय घडलं? : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम रविवार फलटण तालुक्यातील बरड येथे होता. बरड गावानजीकच्या टोलनाका येथे मुक्कामासाठी वारकरी तंबू उभारत होते. त्यावेळी तुषार बावनकुळे या वारकऱ्याचा लोखंडी रॉडला हात लागताच ते रॉडला चिकटले. त्यांना बाजूला करण्यासाठी गेल्यानंतर मधुकरराव शेंडेही चिकटले. दोघांनाही विजेचा जबर शॉक लागला. 108 ॲम्ब्युलन्सला पाचारण करून तातडीने त्यांना नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोघांचाही मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता व्होरा यांनी सांगितलं.


दोन्ही वारकरी होते विठ्ठलभक्त : फलटण तालुक्यातील बरडजवळ रविवारी पालखीचा मुक्काम होता. शेंडे आणि बावनकुळे आपल्या तंबूत विश्रांती घेत होते. कपडे वाळत टाकण्यासाठी दोरी बांधत असताना बाजूच्या विजेच्या खांबातून जोरात शॉक लागल्यानं दोघेही बेशुद्ध पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मधुकर शेंडे आणि तुषार बावनकुळे हे निस्सीम विठ्ठलभक्त होते.



दुर्घटनांमुळं वारकऱ्यांवर शोककळा : आषाढी वारीच्या काळात यापूर्वी अनेक मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. रेल्वेतून पडल्याने आणि चंद्रभागा नदीत बुडाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, विजेचा धक्का लागून दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण वारकऱ्यांवर शोककळा पसरली आहे. तसंच वारीच्या काळात हृदयविकाराच्या झटक्याने, अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत.

हेही वाचा -

  1. वडील शेतामध्ये जाताना मुलाची झाली अखेरची भेट : कुलरचा शॉक लागून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
  2. कुलरचा शॉक लागून आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू: पावसाळ्यात कुलर वापरताना घ्या काळजी
  3. पाण्याच्या टाकीचं काम करताना विजेचा शॉक लागून बिहारच्या 3 कामगारांचा मृत्यू - Bihar WORKERS DEATH