माऊलींच्या अश्वराजांची श्रीमंत दगडूशेठ गणपतीला अनोखं वंदन, मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
‘माऊली माऊली’ आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली.

Published : June 18, 2025 at 7:20 AM IST
|Updated : June 18, 2025 at 2:15 PM IST
पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली. अश्वांनी मंदिराच्या थेट सभामंडपात प्रवेश करुन गणरायाला वंदन केले. यावेळी 'ज्ञानोबा माऊली तुकाराम', 'माऊली माऊली' आणि 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष झाला. मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
मंदिरात अश्वांचे पूजन - दरम्यान, कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या दोन अश्वांचे मंगळवारी (17 जून) आगमन पुण्यामध्ये झाले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, ज्ञानेश्वर रासने, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, प्रतीक घोडके, राजू वायकर, रोहित लोंढे यांसह श्रीमंत उर्जितसिंह शितोळे, श्रीमंत महादजी राजे शितोळे, युवराज विहानराजे शितोळे, श्रीमंत मोहिनीराजे शितोळे यांच्यासह पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माऊलींचे अश्व आणि गणरायाची अनोखी भेट या मंगलप्रसंगी शितोळे सरकार म्हणाले की, "दरवर्षी सुमारे 300 किलोमीटरचा पायी प्रवास करुन हे अश्व वारीला जातात. काही वर्षांपूर्वी या प्रवासात मंदिराबाहेरून गणरायाचे दर्शन होत असे. आता दरवर्षी अश्व गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना देत आहेत, ही शुभ गोष्ट आहे. माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट आहे".
वारीची शेकडो वर्षांची परंपरा - यंदा देखील गणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व आता आळंदीकडे प्रस्थान करतील. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितले की, "गेल्या काही वर्षांपासून हे अश्व मंदिराच्या सभामंडपात येऊन गणरायाला मानवंदना देत आहेत. वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यंदा देखील या अश्वांनी मंदिरात येत गणरायाचे दर्शन घेतले. आषाढी वारी ही विठ्ठल भक्तांची वारी आहे. त्यामुळे ज्यांना या वारीला येता येत नाही, ते या अश्वांचे दर्शन घेतात".
हेही वाचा
- पालखीत वारकऱ्यांसाठी सुविधा तातडीनं पुरवा; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले 'हे' नवे बदल, पाहा व्हिडिओ
- श्री संत मुक्ताई यांच्या पालखीनं चढला बुलढाण्यातील प्रसिद्ध राजुर घाट; संत मुक्ताबाईंच्या पालखीचं 318 वे वर्ष
- पाऊले चालती पंढरीची वाट…; संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडं प्रस्थान

