पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं पुण्यात शुक्रवारी आगमन झालं असून शनिवारी पालखीचा मुक्काम पुण्यात आहे. पुण्यातील नाना पेठेत दोन्ही पालख्या मुक्कामाला असताना शहराच्या आजूबाजूला पुणेकर नागरिक तसंच विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीनं वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबवले जातात. पुण्यातील साखळीपीर तालीम इथं गेल्या 30 वर्षापासून अब्दुल रज्जाक चाचा हे वारकऱ्यांची सेवा करत आहेत. विशेष म्हणजे अब्दुल रज्जाक चाचा हैदराबाद इथले असून ते पालखीच्या वेळेस पुण्यात येतात आणि वारकऱ्यांची सेवा करतात. एवढंच नव्हे रज्जाक चाचा हे स्वतः तेल बनवतात आणि पुण्यात येऊन वारकऱ्यांची सेवा करतात.
'हा' आहे रज्जाक चाचा यांचा व्यवसाय : जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा शनिवारी पुण्यात मुक्काम असून शहरात वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबवले जातात. यासह वारकऱ्यांना अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. यात हैदराबादचे रहिवासी अब्दुल रज्जाक चाचा हे वारकऱ्यांची सेवा करताना पाहायला मिळत आहेत. अब्दुल रज्जाक चाचा जरी मूळचे हैदराबादचे असले तरी ते पुण्यात काही वर्ष राहायला होते. जडीबुटीपासून तेल तयार करून विविध आजारांवर औषधोपचार करण्याचा रज्जाक चाचा यांचा व्यवसाय आहे.
आषाढी एकादशीच्यावेळी पुण्यात येऊन करतात सेवा : मागील तीस वर्षांपासून रज्जाक चाचा हे पुण्यात वारकऱ्यांची सेवा करत आहेत. 8 ते 10 वर्षापूर्वी ते हैदराबाद येथील नारायण पेठ इथं राहायला गेले. मात्र असं असलं तरी ते आषाढी एकादशीच्यावेळी ते पुण्यात येतात आणि वारकऱ्यांची सेवा करतात.
30 वर्षांपासून करतात सेवा : "मागील 30 वर्षापासून मी सातत्यानं वारकऱ्यांची सेवा करत आहे. पुण्यात असताना साखळीपीर तालीमचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर यांना मला वारकऱ्यांची सेवा करायची आहे असं सांगितलं आणि तेव्हापासून मी आजपर्यंत वारकऱ्यांची सेवा करत आहे. दरवर्षी पालखीचं वेळापत्रक जाहीर झाल्यावर मी हैदराबादवरून पुण्यात येतो आणि वारकऱ्यांची सेवा करतो. वारकऱ्यांची सेवा करून मला खूप आनंद मिळतो. एक गोष्ट आवर्जून सांगतो की या आजपर्यंत अनेक संकटं आली पण या सेवेनं सर्व संकटं दूर झाली," अशी प्रतिक्रिया अब्दुल रज्जाक चाचा यांनी दिली.
जातीधर्माच्या पलीकडं जाऊन सेवा : "आम्ही अनेक वर्ष झाली रज्जाक चाचा यांच्याकडून मालिश करून घेतो. मालिश झाल्यानंतर आम्हाला खूप बरं वाटतं. तसंच एक सामाजिक संदेश या माध्यमातून रज्जाक चाचा देतात. जाती धर्माच्या पलीकडं जाऊन चाचा वारकऱ्यांची सेवा करतात," अशी प्रतिक्रिया वारकऱ्यांनी दिली.
हेही वाचा :
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं दर्शन, वारकऱ्यांना दिल्या शुभेच्छा
- विठ्ठल नामाच्या गजरात पुणे दुमदुमलं; दोन्ही संतांच्या पालख्या शहरात दाखल, दोन दिवस मुक्काम
- सावळ्या मिशीवाल्या विठ्ठलाचं दर्शन तुम्ही घेतलंय का? जाणून घ्या मिशीवाल्या विठ्ठलाबद्दल...