ETV Bharat / state

समृद्धी महामार्ग आणि वाढवण बंदराला जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉरला मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जाणारा समृद्धी महामार्ग वाढवण बंदराला जोडण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय.

Approval for freight corridor connecting Samruddhi Highway and Vadhan Port
समृद्धी महामार्ग आणि वाढवण बंदराला जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉरला मंजुरी (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 5, 2025 at 4:34 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी (5 ऑगस्ट) पार पडली. दरम्यान, महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जाणारा समृद्धी महामार्ग वाढवण बंदराला जोडण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय. वाढवण बंदर (तवा) ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (भरवीर) यांना जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉरला मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलीय. याशिवाय, अन्य सहा महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आलेत.

समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडला जाणार : समृद्धी महामार्गामुळं विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील 24 जिल्हे जेएनपीटी बंदराशी जोडले गेलेत. आता हा महामार्ग वाढवण बंदराशी जोडला जाईल. 701 किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी 55 हजार 335 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. समृद्धी महामार्गाचा 76 किलोमीटर मार्ग नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून जातोय. या भागात सह्याद्रीच्या डोंगर रांगा असून अतिशय खडतर भौगोलिक परिस्थितीत मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं हे अभियांत्रिकी आव्हान पेललं आहे. यातील इगतपुरीजवळील बोगदा हा 8 किलोमीटर लांबीचा असून तो राज्यातील सर्वाधिक लांबीचा आणि देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय...
• महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरणाला (२०२५) मंजुरी
• राज्य शासनाच्या छोट्या, चिंचोळ्या आकाराच्या, बांधकामास अयोग्य, उपयुक्त आकार नसलेल्या, सुलभ पोहोच मार्ग नसलेल्या किंवा लॅण्‍ड लॉक्ड स्वरुपातील भूखंडांच्या वितरण धोरणास मंजुरी.
• महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर. सुधारित धोरणास मंजुरी.
• नागपूर विणकर सहकारी सूतगिरणीच्या १ हजार १२४ कामगारांना ५० कोटींचे सानुग्रह अनुदान मिळणार. सुतगिरणीच्या जमीन विक्रीतून निधीची तरतूद.
• जळगांव जिल्ह्यातील मौजे पाचोरा येथील भुखंडावरील क्रींडागणाचे आरक्षण वगळून, त्याचा रहिवास क्षेत्रात समावेश करण्यास मान्यता.
• कुष्ठरुग्णांसाठी कार्यरत स्वयंसेवी सस्थांच्या अनुदानात वाढ, अनुदान २ हजारांवरून 6 हजार करण्यास मान्यता.