मुंबई- गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांतच विमानाला अपघात झाला. विमानात 242 लोक होते, ज्यात 12 क्रू मेंबर्स होते. अपर्णा महाडिकदेखील क्रू मेंबर्समध्ये होत्या. अपर्णा ही राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांची नातेवाईक आहे. ती तटकरेंची चुलत बहीण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, "अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानातील वरिष्ठ क्रू मेंबर अपर्णा महाडिक माझ्या नातेवाईक आहेत. अपर्णा महाडिक माझ्या धाकट्या बहिणीची सून आहे. त्यांचे कुटुंब मुंबईतील गोरेगाव येथे राहते."
महाडिक कुटुंबाला कळवण्यात आलंय- तटकरे : रायगडचे खासदार तटकरे पुढे म्हणाले की, “ माझा भाचा म्हणजेच अपर्णाचा पती हा देखील एअर इंडियाच्या केबिन क्रूमध्ये आहे. तो दिल्लीत होता. महाडिक कुटुंबाला या दुर्घटनेची माहिती देण्यात आली आहे.
विमान अपघातात 12 क्रू मेंबर्ससह 241 जणांचा मृत्यू : एअर इंडियाचे हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. या विमान अपघातात 12 क्रू मेंबर्ससह 241 जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच एअर इंडियाच्या विमान AI171 ला झालेल्या अपघातात अपर्णा महाडिक (42) या मृत्युमुखी पडल्या. बोईंग 787 ड्रीमलायनर विमान अहमदाबादहून लंडन(गॅटविक)ला जात होते आणि त्यात 242 प्रवासी होते.
माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील विमानात : विमानात प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते विजय रुपाणी हे देखील होते. या विमान अपघातात एक व्यक्ती बचावलाय. माहिती देताना अहमदाबादचे पोलीस आयुक्त म्हणाले की, या अपघातात एक व्यक्ती बचावलीय, ज्यावर उपचार सुरू आहेत. अहमदाबाद सिव्हील हॉस्पिटलमध्ये मेडिकल इमर्जन्सी जाहीर करण्यात आली आहे. रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी दिसून येत आहे.
मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू : एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील मेघनानी नगरमधील सिव्हिल हॉस्पिटल आणि बीजे मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफच्या निवासी निवासस्थानाजवळ कोसळले. विमानाचा काही भाग बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीवरही पडला. तिथे मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते गृहमंत्री अमित शाह आणि नागरी उड्डाण मंत्री यांच्यापर्यंत सर्वजण या संदर्भात सतत माहिती घेत आहेत.
हेही वाचाः
प्रतिकूल परिस्थितीत यशाची भरारी घेऊन रोशनी झाली हवाई सुंदरी, विमान अपघातात गमावले प्राण