मुंबई Anant chaturdashi 2024 : अवघी मुंबई गणेशोत्सवाच्या आनंदात न्हाऊन निघाली आहे. गणेशोत्सवामध्ये मुंबईतील खास आकर्षण असतं ते गिरगाव आणि लालबागमध्ये. लालबाग मधील गणेश गल्लीतील मुंबईचा राजा आणि लालबागचा राजा पाहण्यासाठी आणि त्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची तुडुंब गर्दी उसळलेली असते. तसंच चिंचपोकळीचा चिंतामणी, राजा तेजूकायाचा आणि काळाचौकीचा महागणपती हे देखील पाहण्यासाठी भाविकांची रीघ लागलेली आहे. अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत होणारी गर्दी पाहता अनेक मंडळांनी विसर्जनाच्या मार्गाचं नियोजन केलं आहे. लालबागमध्ये सर्वप्रथम सकाळी आठ वाजता मुंबईच्या राजाची गणेश गल्लीत आरती केली जाईल. त्यानंतर सव्वा आठ वाजताच्या सुमारास मुंबईचा राजा विसर्जनाच्या दिशेने मार्गस्थ होणार असल्याची माहिती लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे सचिव स्वप्नील परब यांनी दिली आहे.
बाप्पाचे मनसोक्त दर्शन : उद्या गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजेच अनंत चतुर्दशी. लालबाग मधील विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी गणेश भाविकांचा जनसागर लोटलेला असतो. ज्या भाविकांना गेल्या दहा दिवसांमध्ये बाप्पाचे दर्शन घेता आले नाही ते भाविक या विसर्जन मिरवणुकीत आपल्या लाडक्या बाप्पाचे मनसोक्त दर्शन घेतात. सव्वा आठ वाजता मुंबईचा राजा मागच्या गल्लीतून विसर्जनाच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर साडेअकरा वाजता पोहोचेल. उत्सव मंडळाच्या वतीने यंदा 97 वा गणेशोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. यंदा मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये मंडळाच्या वतीने विसर्जन सोहळ्या दरम्यान गणेश गल्लीच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर पाच मिनिटांचा समाज प्रबोधनाचा अनोखा आकर्षक कार्यक्रम सादर केला जाईल. हा कार्यक्रम चालू असताना वाद्ये काही वेळा करता बंद केली जातील. तद्नंतर ढोल ताश्यांच्या गजरात आणि जनसागराच्या उपस्थितीत मुंबईचा राजा विसर्जनाकरता गिरगाव चौपटीकडे मार्गस्थ होईल, अशी माहिती सचिव स्वप्नील परब यांनी दिली आहे.
त्यानंतर राजा तेजुकायाच्या विसर्जनाची मिरवणूक निघेल. नऊ-साडेनऊ वाजताच्या सुमारास लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीची तयारी करण्या करता आज सकाळी सहा वाजता चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद करण्यात आली आहे. आज दुपारी बारा वाजता मुखदर्शनाची रांग देखील बंद करण्यात आली आहे. मुंबईचा राजा विसर्जनासाठी निघाल्यानंतर त्यादरम्यान नरे पार्क मैदानावर विराजमान झालेला परळचा राजा देखील गिरगाव चौपाटीच्या दिशेने विसर्जनासाठी मार्गस्थ होणार आहे. तसंच चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचा चिंचपोकळीचा चिंतामणी या बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीची तयारी करण्याकरता आज सायंकाळी सहा वाजता चरण स्पर्श दर्शनाची रांग बंद करण्यात येणार असून रात्री बारा वाजता मुखदर्शनाची रांग बंद करण्यात येणार असल्याची माहिती या मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत यांनी दिली आहे.
हेही वाचा..