ठाणे : अभ्यासाच्या नावानं शंख, असं पालक आपल्या पाल्यांना म्हणत असतात. पण, याच शंखाचा अभ्यास ठाण्यातील शंख प्रेमींना करता येणार आहे. अनंतविजय, सुघोष, पौंड्र ही नावं तुम्हाला बुचकळ्यात टाकणारी वाटतात ना? तर ही नावं आहेत महाभारतकालीन शंखांची! अशा १४० जातींच्या जवळपास ६७० शंखांचे अद्वितीय प्रदर्शन पाहण्याची संधी ठाणेकरांना मिळणार आहे. हे प्रदर्शन २० एप्रिलपर्यंत कृष्णाई हॉल, पोखरण रोड क्रमांक २, बेथनी हॉस्पिटल समोर, ठाणे (पश्चिम) इथं आयोजित करण्यात आलं असून ठाणेकरांना सकाळी १० वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत पाहण्याची संधी मिळणार होणार आहे. या प्रदर्शनात प्रवेश विनामूल्य आहे.
महाभारतकालीन पौराणिक शंखही समाविष्ट : ठाण्यातील आनंद भिडे या शंख अभ्यासकांनी जगभरातून १४० जातींच्या तब्बल ६७० शंख संग्रहित केले आहेत. हे अद्वितीय संग्रह आता ठाणेकरांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये महाभारतकालीन पौराणिक शंखही समाविष्ट आहेत. श्रीकृष्णांचा पांचजन्य, युधिष्ठिराचा अनंतविजय, नकुलाचा सुघोष, भीमाचा पौंड्र, तसंच गौरी शंख, अत्रवणी शंख, मोली शंख, रानी शंख, गणेश शंख आणि १९ इंची भव्य हनुमान शंख हे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. विशेष म्हणजे, ३०० हून अधिक शंखांच्या टपाल तिकिटांचं संकलनही इथं पाहायला मिळेल. तसंच पूजेसाठी उपयोगी शंख, वाजविण्याचे शंख तसंच विविध शंख विक्रीसाठीही उपलब्ध असणार आहेत.
पुस्तकांचीही विक्री होणार : शंखांवरील मराठी व इंग्रजी भाषेतील शास्त्रीय आणि आध्यात्मिक पुस्तके, उदा. शंखशकली, शंखरूपी विज्ञान, तसेच श्री हरीहर (शाळिग्राम व रुद्राक्ष विषयक) पुस्तकांचीही विक्री होणार आहे. या प्रदर्शनाचं संकलन आनंद भिडे यांनी केलं असून, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे संवर्धन करण्याच्या त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा हा एक भाग आहे. दरम्यान, शंखप्रेमींनी आणि कुतूहल असलेल्या प्रत्येकानं हे प्रदर्शन जरूर पाहावं. शंखबाबत अधिक माहितीसाठी ९८२०३३५९४३ यावर संपर्क साधण्याचं आवाहन अभ्यासक आनंद भिडे यांनी केलं आहे.
अनेक आजारांवर लाभदाई शंखशंख : हे नियमित पणे वाजवल्यास त्याचा फायदा अनेक आजारांसाठी होत असतो. याची इत्यंभूत माहिती देखील या ठिकाणी देण्यात येणार आहे. दमा, अस्थमा, जीभ जड असलेल्या रुग्णांना शंख वाजवण्याचा लाभ होतो. यासोबत एकाग्रशक्ती वाढवण्यासाठी रक्ताभिसरण चांगल्या रीतीनं होण्यासाठी शंख फायदेशीर आहेत.
शंख आणि त्यासंबंधी माहिती : आपल्या देवघरात अग्रस्थानी असलेल्या शंख कसा असतो आणि त्याचा फायदा माणसाला कसा होऊ शकतो? याचा अभ्यास करताना आनंद भिडे यांनी शंख संग्रह सुरू केला. कालांतरानं त्याचं प्रदर्शन करून नागरिकांना, विद्यार्थ्यांना याची गोडी लागावी म्हणून आनंद भिडे यांनी अनेक दशकांपासून हा संग्रह केला आहे. दरम्यान, शंखनाद आणि अध्यात्म याचा जवळचा संबंध आहे. खरे शंख आणि तयार केलेले शंख हे पटकन ओळखता येतात, ते कसे ओळखावे? हे देखील या प्रदर्शनात माहिती स्वरूपात पाहायला मिळत आहे.
हेही वाचा :
"आमच्यातले वाद, भांडण छोटी", राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना युतीसाठी पुन्हा टाळी ?
'औरंगजेबानं नागरिकांवर अत्याचार केले, मात्र काही लोक त्याला नायक मानतात': राजनाथ सिंहांचा हल्लाबोल