नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-मनसेच्या युतीच्या चर्चांनी जोर पकडलाय. दोन्ही पक्षांचे अनेक नेते युतीसंदर्भात विधानं करताना दिसतायत. मनसेचे नेते अमित ठाकरेंनीही संजय राऊतांना आमच्या कॅफेटेरियामध्ये कॉफी प्यायला येण्याचं आमंत्रण दिलंय. त्यालाच आता संजय राऊतांनीही प्रतिसाद दिलाय. ते नवी दिल्लीत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
मी कॅफेमध्ये नाही मी घरी जाईन : अमित ठाकरेंना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलेलं आहे. गोड मुलगा आहे आणि त्याची विधानंही गोड आहेत. जी भावना आहे, त्या भावनेचं मी काका म्हणून स्वागत करतो. त्यांची विधानं फार चांगली आहेत. आदित्यची भूमिकाही फार उत्तम आहे. आता तुम्हाला मनोमीलन म्हणजे अजून काय मनोमीलन हवंय. मी कॅफेमध्ये नाही मी घरी जाईन. आमच्यासाठी ते कॅफे नाही. आमच्यासाठी ते दुसरं घरंच आहे, असंही संजय राऊत म्हणालेत.
काय सांगावं फोन झालेसुद्धा असतील : तसेच आदित्य आणि अमित या मुलांच्या जन्माच्या आधीपासून ते दोन भाऊ आहेत. मी त्या दोघांनाही पाहिलंय. सोशल मीडियावर सांगून कोणी एकमेकांना फोन करीत नाही. काय सांगावं फोन झालेसुद्धा असतील. तुम्हाला फळ दिसल्याशी कारण आहे ना. ज्याला तुम्ही फ्रुटफुल टॉक म्हणता, तुम्हाला फळ दिसेल ना.फळ झाडावर यायला आधी बी लावावी लागते. मग पाणी घालावं लागतं. रोपटं वाढवावं लागतं. मग फांद्या येतात. अशा अनेक प्रक्रियेतून फळं येत असतात. त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. काही दिवसांनी तुम्ही म्हणाल, खूपच झाडाला फळं आली, एवढ्या लवकर फळं आली कशी? फळं येतील ना, असंही संजय राऊतांनी सांगितलंय.
उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत : नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र आंदोलन केल्यासंदर्भात राऊतांना विचारलं असता ते म्हणाले की, नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळेच कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलेलं आहे. आम्ही सकारात्मक आहोत. राज ठाकरे सकारात्मक आहेत. त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत. दोन्ही पक्षांचे सहकारी अत्यंत सकारात्मक असल्यामुळे त्याचा परिणाम जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर झाला असेल, त्यात चिंतेचं कारण काय?तुम्ही त्याचं स्वागत केलं पाहिजे, असंही संजय राऊत म्हणालेत.
हेही वाचाः
इकडे तिकडे बघू नका; संजय राऊत पक्ष बुडवत आहेत- संजय शिरसाट यांचा टोला