शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना, मुंबईसाठी तुम्ही काय केलं? अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईसह महाराष्ट्राच्या विकासावरून काँग्रेससह शिवसेनेवर (यूबीटी) टीका केली. ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या कार्यक्रमात बोलत होते.

Published : June 20, 2025 at 9:20 PM IST
मुंबई - खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे. हे त्यांनी सर्वांना दाखवून दिलं आहे. पण, मुंबईंवर अनेक वर्ष सत्ता असणाऱ्यांनी मुंबईसाठी काय केलं? असा सवाल करत केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या नुतनीकृत मुख्यालयाच्या उद्घाटन समारंभात अमित शाह बोलत होते.
शिवसेनेच्या (यूबीटी) वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमित शाह आणि भाजपावर जोरदार टीका केली होती. या टीकेला केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी मुंबईसह महाराष्ट्राच्या विकासावर बोलताना विरोधी पक्षांवर टीका केली. अमित शाह म्हणाले, "महायुती सरकारनं अटल सेतू , वरळी सी लिंक, कोस्टर रोड असे अनेक मोठे प्रोजेक्ट यशस्वी केले आहेत. परंतु, तुमचा एवढा काळ सरकारमध्ये होत. तुम्ही मुंबईसाठी काय केले?" असा सवाल उपस्थित करत अमित शाहांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
"खरी आणि असली शिवसेना ही एकनाथ शिंदेंनी दाखवून दिली आहे, असं म्हणत शाहांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले. महाराष्ट्रात अनेक उद्योगधंदे आले होते. परंतु त्याला आधीच्या सरकारला चालना देता आली असती. ती संधी काँग्रेसकडे होती. परंतु एवढ्या वर्षाची सत्ता असताना त्यांनी महाराष्ट्र आणि मुंबईसाठी काही केले नाही," असा हल्लाबोल अमित शाहांनी यावेळी केला.
मुंबई आणि महाराष्ट्रातील उद्योगधंदे हे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देतात. त्यामुळं महाराष्ट्राचे कौतुक करावे लागेल. दुसरीकडे काँग्रेसने एवढी वर्ष सत्ता भोगली. पण महाराष्ट्र आणि मुंबईसाठी काय केले-केंद्रीय गृहमंत्री, अमित शाह
मग तुम्ही का केले नाही?- "आज आमचे महायुतीचे डबल इंजिनचे सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगलं काम करतात. महाराष्ट्राला विकासाच्या दिशेनं नेण्याचे काम करत आहेत. परंतु हे करत असताना त्यांच्यावरती टीका-टिप्पणी केली जात आहे. मुंबईतील झोपडपट्टी, धारावी आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. मोठ्या प्रकल्पावरून विरोधक टीका करतात. पण, आम्ही केलेली कामे आणि प्रकल्प तुम्हालाही करता आले असते. तुम्ही न केल्यामुळं ते आमच्यावर करण्याची वेळ आली आहे," अशी टीका शाह यांनी केली.
मुंबई हा देशाचा आर्थिक केंद्रबिंदू- "मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये उद्योगधंद्याला पोषक वातावरण आहे. देशातील सर्वात उद्योगधंदे हे महाराष्ट्रात आहेत. कारण, इथे उद्योगधंद्यासाठी अनुकूल आणि पोषक वातावरण आहे. मुंबईच्या बाबतीत सांगायचं झालं तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईत सर्व आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातून केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मुंबईत आरबीआयचे मुख्यालय, शेअर मार्केट आणि सेबीचे मुख्यालय आहे. मोठमोठे आणि महत्त्वाची कार्यालयं ही मुंबईत आहेत. आज महाराष्ट्र चेंबर कॉमर्स या मुख्यालयाचे उद्घाटन होतंय. यांच्याकडून भविष्यात पुढील शंभर वर्ष चांगले कार्य घडावं, यासाठी मी शुभेच्छा देतो", असं अमित शाह यावेळी म्हणाले.
हेही वाचा-

