मुंबई 7/11 बॉम्बस्फोट : हे निर्दोष असतील, तर खरे गुन्हेगार कोण? ते कुठे आहेत आणि त्यांना शिक्षा कधी होणार? पीडित कुटुंबांचा संतप्त सवाल
मुंबई लोकल साखळी बॉम्ब स्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यानंतर पीडित कुटुंबांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Published : July 21, 2025 at 9:34 PM IST
मुंबई : मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट घटनेच्या 19 वर्षांनंतर सोमवारी (21 जुलै) मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणातील 12 आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. यानंतर आता विविध स्तरांतून प्रतिक्रिया समोर येत आहेत. 'प्रशासनाकडून न्यायाची अपेक्षा होती, पण आजच्या या निर्णयामुळे धक्का बसला आहे,' असं या साखळी बॉम्ब स्फोटात पाय गमावलेल्या हंसराज कनोजिया यांनी म्हटलं आहे. "या निर्णयानंतर गेले 19 वर्ष न्यायासाठी करत असलेला संघर्ष डोळ्यासमोरून हलत नाही. आम्ही न्यायासाठीचा प्रयत्न सुरूच ठेऊ आणि प्रशासनानं दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, यासाठी संघर्ष करू", अशी भावना कनोजिया यांनी व्यक्त केली.
सर्वोच्च न्यायालयात जावं, किरीट सोमय्या यांची मागणी : मुंबईतील 2006 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या निर्णयानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पीडित कुटुंबांसोबत मंत्रालयात जाऊन अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल यांची भेट घेतली. यावेळी सोमय्या म्हणाले, "मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की, तपास यंत्रणा आणि कायदेशीर सल्लागारांची नवी टीम तयार करून सर्वोच्च न्यायालयात अपील करावं. मुंबईकरांना न्याय मिळालाच पाहिजे." न्यायालयीन प्रक्रियेत त्रुटी राहिल्या असतील, तर त्या दूर करून पुढील लढाई सर्वोच्च न्यायालयात लढण्याचा निर्धार सौमय्या यांनी व्यक्त केला. "आम्ही पीडितांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. जे खरोखर दहशतवादी आहेत, त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे," असंही सोमय्या यांनी स्पष्ट केलं.
'तपासात त्रुटी, सबळ पुरावे सादर करण्यात यंत्रणेला अपयश' : मुंबई उच्च न्यायालयानं 2006 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपींची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयानं नमूद केलं की, तपास यंत्रणांना संशयाच्या पलिकडे जाऊन ठोस पुरावे देता आले नाहीत. बॉम्ब, बंदुका, नकाशे जरी जप्त केले असले तरी, बॉम्बचा प्रकार ओळखण्यात फिर्यादी पक्ष अपयशी ठरला. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या त्रुटी दूर करून सरकारनं सर्वोच्च न्यायालयात अपील करावं, अशी मागणी केली आहे.
हे निर्दोष असतील तर खरे गुन्हेगार कोण आहेत? चिराग चौहान यांचा संतप्त सवाल : 2006 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात गंभीर जखमी झालेले चिराग चौहान यांनी संताप व्यक्त केला आहे. या बॉम्बस्फोटात चिराग यांच्या शरीराचा कमरेखालील भाग पूर्णतः निकामी झाला. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. न्यायालयानं सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर बोलताना, चौहान यांनी हा निर्णय धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. "न्यायालयानं निर्णय देताना तपास यंत्रणांकडून झालेल्या त्रुटींचाही उल्लेख केला आहे. मग या त्रुटींची जबाबदारी कोण घेणार", असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. "जर हे आरोपी खरंच निर्दोष असतील, तर मग खरे गुन्हेगार कोण? ते अजून कुठे आहेत? आणि त्यांना शिक्षा कधी होणार?" असा संतप्त प्रश्नही चिराग चौहान यांनी उपस्थित केला.
संपूर्ण प्रकरण काय आहे? : 11 जुलै 2006 रोजी मुंबईतील लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाला 19 वर्षे पूर्ण झाली आहेत. या प्रकरणातील सत्र न्यायालयाचा निकाल जाहीर होऊन 10 वर्षे झाली. 31 जानेवारी 2025 रोजी राखून ठेवलेला निकाल मुंबई उच्च न्यायालयानं सोमवारी (21 जुलै) जाहीर केला. या प्रकरणात फाशीची शिक्षा देण्यात आलेल्या आरोपींची फाशी निश्चित करण्यासाठी नियमानुसार मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. तर आरोपींनी सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या खटल्यात जुलै 2024 ते जानेवारी 2025 या दरम्यान न्यायमूर्ती अनिल किल्लोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठानं नियमित सुनावणी घेतली होती.
कुणाकुणाची झाली निर्दोष सुटका? : या प्रकरणात कमाल अन्सारी, मोहम्मद फैझल, एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी, नवीद हुसेन खान व आसिफ खान या 5 जणांना रेल्वेत बॉम्ब ठेवल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं होतं. या सर्वांना या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यातील कमाल अन्सारीचा कोरोनामुळे नागपूर कारागृहात मृत्यू झाला होता. आता उर्वरित 4 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या 7 आरोपींमध्ये तन्वीर अहमद अन्सारी, मोहम्मद माजिद शफी, शेख मोहम्मद अली आलम, मोहम्मद साजिद मार्गुब अन्सारी, मुझ्झम्मिल अताउर रहमान शेख, सुहेल मेहमूद शेख व जमीर अहमद लतीफ उर रहमान शेख यांचा समावेश आहे. या सातही जणांना न्यायालयानं निर्दोष ठरवलं आहे.
हेही वाचा -
- "सरकारनं आमची चेष्टा चालवून, न्यायाचा खेळ मांडलाय का?", 7/11 साखळी बॉम्बस्फोटातील पीडित कुटुंबीयांचा आर्त सवाल
- 7/11 साखळी बॉम्बस्फोट प्रकरण: ‘निर्णयावर विचार, मग सुप्रीम कोर्टात दाद,’ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया
- मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयाकडून सर्व 12 दोषींची निर्दोष मुक्तता

