मुंबई- अजित पवार आणि शरद पवार एकत्र आलेले आहेत. आम्हाला आतापर्यंत शिंदेंसोबत भेटताना किंवा चहा पिताना पाहिले आहे का? एकत्र व्यासपीठावर आम्ही कधी भेटत नाही. कारण आमच्याकडे वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट नाही, आमच्याकडे रयत शिक्षण संस्था नाही, आमच्याकडे विद्या प्रतिष्ठान नाही, जी एकत्र येईल. आमच्याकडे काहीच नाही, आम्ही एकत्र आलोय अमुक कारणासाठी आणि बंद खोली आड बसलो, असं काही नाहीये. तो त्यांचा प्रश्न आहे, असे शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सांगितलंय. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
दोघांनीही आपापल्या भूमिका मांडलेल्या आहेत : संजय राऊत यांनी पुन्हा एकत्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यावरही भाष्य केलंय. आतापर्यंत महाराष्ट्राच्या भावना याच होत्या, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रे हातात घेतली पाहिजे. ती आतापर्यंत लोकभावना होती किंवा आहे. मग आता प्रश्न का निर्माण केला जातोय. महाराष्ट्राच्या मनात जे आहे, ती भावना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही व्यक्त केलीय. दोघांनीही आपापल्या भूमिका मांडलेल्या आहेत. दोन प्रमुख नेते जेव्हा अशा भूमिका मांडतात तेव्हा त्या आपण गांभीर्यानं घेतल्या पाहिजेत आणि पुढे जायला पाहिजे, असंही संजय राऊत म्हणालेत.
महाराष्ट्रानं सातत्यानं ठाकरेंवर मनापासून प्रेम केलं : काही लोकांना त्या विषयी वेदना होणार कारण जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र झाले किंवा राजकारण एकत्र केलं. तर आम्हाला कायमचं शेतावर जावं लागेल किंवा आम्हाला कायम दक्ष शाखेत जावं लागेल. महाराष्ट्र हा कायम ठाकरेंवर प्रेम करत आलाय, महाराष्ट्र हा ठाकरेंवर प्रेम करणार महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रानं सातत्यानं बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर मनापासून प्रेम केलं आणि आजही करतोय. पिढ्या बदलल्या पण प्रेम कमी होत नसल्यानं त्यांना भीती वाटत असेल. त्यांच्या पोटातून मळमळ बाहेर पडत असेल त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आम्ही सकारात्मक दृष्टीनं याकडे पाहतो. चले जाओची ढिणगी या महाराष्ट्रातच पडली आणि त्यामध्ये मराठी गिरणी कामगार पुढे होता, असंही संजय राऊत यांनी सांगितलंय.
आमच्या भावना स्वच्छ आहेत : मनसेसंदर्भात शिवसेनेनं वादग्रस्त वक्तव्य केल्यासंदर्भात विचारले असता संजय राऊत म्हणाले, आमच्या शिवसेनेत कोणीच असं वक्तव्य केलेलं नाही. आमच्या भावना स्वच्छ आहेत. कोणी कितीही खाजवत बसू द्या. आम्ही ठरवलं आहे की, एक पाऊल पुढे टाकायचे. मागे आम्ही काय बोललो आणि ते काय बोलले हे विसरायला पाहिजे. भूतकाळात वळायचं नाही हे फॉर्मल आहे, यालाच सकारात्मक दृष्टिकोन बोलतात. जेव्हा आम्ही काँग्रेस सोबत सत्ता स्थापन केली, तेव्हा पण विरोध करीत होतो, पण सत्ता स्थापन केल्यानंतर आम्ही एकमेकांवर टीका केली नाही. कारण आमचं एकत्र यायचं ठरलं होतं, असंही संजय राऊत म्हणालेत. 2014 भारतीय जनता पार्टी पक्षाने आमच्यासोबत युती तोडली, तेव्हा एकमेकांवर प्रचंड टीका केली, पण पुन्हा आम्ही एकत्र आलो, तेव्हा आम्ही भूतकाळ विसरलो. शिवसेना पक्षप्रमुख हा सकारात्मक विचार करणार आहेत. आम्हाला महाराष्ट्राचा विचार करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे, भविष्याचा विचार करायचा आहे, त्यामुळे या संदर्भात वेगळी भूमिका मांडायची नाही चार भिंती आत आपण बोलू यात, असं म्हणत संजय राऊतांनी मनसेला टाळी दिलीय.
हेही वाचाः
ठाण्यात ठाकरे बंधूंच्या एकीचे पोस्टर: महापालिका निवडणुकी अगोदर राजकीय चर्चांना उधाण