ठाणे - अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत महाराष्ट्रात राहणाऱ्या 10 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये डोंबिवली निवासी 27 वर्षीय हवाई सुंदरी रोशनी सोनघरेचाही समावेश आहे. आई- वडिलांनी प्रतिकूल परिस्थितीत तिचे हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं होतं. तिच्या मृत्यूनं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
रोशनीचं छोटसं एकत्र कुटुंब : मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी एअर होस्टेस ( हवाई सुंदरी ) म्हणून कार्यरत होती. रोशनी ही डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील नव उमीया कृपा सोसायटीमध्ये आपल्या आई-वडील आणि भावासह राहत होती. वडील राजेंद्र, आई राजश्री आणि भाऊ विघ्नेश असं छोटंसं एकत्र कुटुंब. मुंबई ग्रांट रोड परिसरात राहणारं हे कुटुंब दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत स्थायिक झालं होतं.
लहानपणापासूनच हवाई सुंदरी होण्याचं होतं स्वप्न- रोशनी हिचा भाऊ विघ्नेश हा एका खासगी शिपिंग कंपनीमध्ये काम करतो. तर आई-वडील हे घरीच असतात. रोशनीचं शिक्षण मुंबईत झालं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र सोनघरे आणि त्यांचे पत्नी राजश्री यांनी आपल्या दोन्ही मुलांना शिकवलं. रोशनीनला लहानपणापासूनच हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न होतं. तिने जिद्द आणि मेहनत करत स्वप्न पूर्ण केलं. बुधवारी आई-वडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली. अहमदाबादच्या फ्लाईटने ती लंडनच्या दिशेनं निघाली होती. मात्र, याच विमानाचा अपघात झाला. त्यामध्ये रोशनीचा मृत्यू झालाय.
रोशनीचा करिअर प्रवास : हवाई सुंदरी होण्याचा तिचा ध्यास होता. मुंबईतील सरस्वती इंग्लिश माध्यमाच्या शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिनं मुंबईतील भारत कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतलं. कॉलेज पूर्ण होताच तिनं अंधेरी येथील संस्थेतून आपलं हवाई सुंदरीचं शिक्षण पूर्ण केलं. यानंतर तिनं 2021 मध्ये स्पाइस जेटमध्ये नोकरी केली. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी रोशनी एअर इंडियामध्ये रुजू झाली.
आवडत्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन : मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मंडणगड येथील असलेले सोनघरे कुटुंब सुरुवातीला गाव सोडून मुंबईतील ग्रँट रोड परिसरात एका दहा बाय दहाच्या खोलीत राहत होते. मात्र, ते दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत स्थायिक झाले होते. रोशनीचे वडील टेक्निशियन असून, मिळेल ते काम करतात. मात्र तरीही त्यांनी दोन्ही मुलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी कायमच प्रोत्साहन दिल्याचे आई सांगते.
सोशल मीडियावर होते ५४ हजार फॉलोअर्स- 'स्काय लव्हर हर' या नावानं ती इन्स्टाग्रामवर प्रभावक (social media influencer) होती. तिला सोशल मीडियावर 54 हजार 'फॉलोवर्स' आहेत. आतापर्यंत तिने विविध प्रकारच्या एक हजाराहून अधिक फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. एअर इंडियाच्या अपघाती विमानात रोशनी सोनघरे कर्तव्यावर असल्याचं समजताच डोंबिवलीचे स्थानिक आमदार आणि प्रदेश भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यासंदर्भात राज्य सरकारच्या आपत्कालीन विमान अपघात विभागाशी संपर्क साधला. त्यांनी तिच्याबाबत माहिती घेणं, रोशनीच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारचं साहाय्य करण्याच्या दृष्टीनं शासन स्तरावरून हालचाली सुरू केल्या आहेत.
हेही वाचा-