नवी मुंबई : विमान अपघातात पनवेल तालुक्यातील न्हावे गावची रहिवासी आणि एअर होस्टेस मैथिली पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. संघर्षातून हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून, ते प्रत्यक्षात आणलेल्या मैथिलीचं अशाप्रकारे अचानक जाणं संपूर्ण रायगड जिल्ह्यासह उरण परिसराला सुन्न करून गेलं आहे. विशेषतः दरवेळी विमान प्रवासाला जाताना सोबत मैथिली भगवद गीता घेऊन जात असे, असं तिच्या नातेवाईकांनी सांगितलं.

स्वप्नांच्या आकाशात झेपावलेली मुलगी मृत्यूच्या अधीन : केवळ 22 व्या वर्षी आकाशात झेप घेणाऱ्या मैथिलीनं दोन वर्षांपूर्वीच एअर इंडियामध्ये एअर होस्टेस म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ती घरातील एकमेव कमावती व्यक्ती होती. तिच्या जाण्यामुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आहेत.
15 वर्षांपासून धाकट्या बहिणीची जबाबदारी उचलली : मैथिलीनं तिची धाकटी बहीण दृष्टी पाटील हिच्या शिक्षणाची जबाबदारी लहानपणापासून उचलली होती. वडिलांच्या आजारपणामुळे दृष्टी मागील 15 वर्षांपासून मामाच्या घरी राहत होती. सध्या ती B.Tech शिक्षण घेत आहे. मोठी बहीण एअर होस्टेस झाली आणि धाकटीला डॉक्टर किंवा इंजिनिअर बनवायचं तिचं स्वप्न होतं. पण आता हे स्वप्न धुळीस मिळालं आहे. ती रोज सकाळी कृष्णाची पूजा करायची. तिच्या मनात नेहमी भक्ती आणि प्रेम भरलेलं होतं. तिनं पहिल्या पगारातून कृष्णासाठी सोन्याची साखळी बनवली होती. कामावर जाताना ती सोबत कृष्ण आणि भगवद गीता घेऊन जात असे. ताईनं मला कधीच मागं वळून पाहू दिलं नाही. तिनं माझ्या स्वप्नांना आपल्या पंखांनी उंच नेलं. पण आता माझं आभाळच हरवलं आहे, असं मैथिलीची बहीण दृष्टी पाटील हिनं म्हटलं.
आजारपणामुळे वडिलांना सोडावी लागली नोकरी : मैथिलीचे वडील मोरेश्वर पाटील यांना काही वर्षांपूर्वी आजारपणामुळे नोकरी सोडावी लागली. आई गृहिणी आहे. अशा स्थितीत संपूर्ण कुटुंबाचा आधार बनलेली मैथिलीचं जाणं, हे आर्थिक आणि मानसिकदृष्ट्याही कुटुंबासाठी मोठा धक्का आहे.“मैथिली ही फारच हुशार आणि समजूतदार मुलगी होती. तिचं स्वप्न मोठं होतं आणि तिनं ते पूर्णही केलं. मात्र नियतीला ते मान्य नव्हतं,” असं तिच्या मामानं यावेळी सांगितलं.
हेही वाचा :
- "विमान कोसळलं ते थेट माझ्याच रूमवरच, 'ओटी'मध्ये होतो म्हणून बचावलो"; निवासी डॉक्टरनं सांगितला अनुभव
- अहमदाबाद विमान अपघात : पहिल्यांदाच विमानात बसलेल्या पवार दाम्पत्यांची ना मुलाशी भेट झाली ना आता कधी भवासोबत होणार भेट
- अहमदाबाद विमान अपघात : पुन्हा फोन करेन; आई-बाबांशी झालं मैथिलीचं शेवटचं बोलणं, पण ती वेळ आलीच नाही . . .