पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं त्रिशताब्दी वर्ष आहे. या निमितानं देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. "अहिल्यादेवींच्या कार्याचे स्मरण करत, त्यांनी समाजहितासाठी घेतलेल्या भूमिकांचा जागर करण्यासाठी त्यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त शिवमल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं 'पुण्यश्लोक 300' या उपक्रमाच्या अंतर्गत 'धनगरी नाद' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात 50 हजार धनगरी ढोल वाजवून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केली जाणार आहे," अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.
त्यांना बोलवायच की नाही हे समाजाला विचारून कळवू : "अखंड हिंदुस्थानात हिंदू धर्माचं संरक्षण, मंदिरांचा जीर्णोद्धार आणि अत्यंत प्रगल्भ असा राज्यकारभार ज्या महाराणींनी केला, त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं त्रिशताब्दी वर्ष आहे. अहिल्याभक्त म्हणून जगात कोणी केलं नसेल असं अभिवादन यंदा करण्यात येणार आहे. पुण्यात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एकाच वेळी 50 हजार धनगरी ढोल वाजवून वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रण दिलं आहे. यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील रेस कोर्स मैदानावर या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना कार्यक्रमाला बोलवणार नाही. हा कार्यक्रम राजकीय नसून कोणाला बोलवावं हे समाजाला विचारून कळवू," असं यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.
धनगरी ढोल आमचा आत्मा : "सध्या काही मोजक्याच समाजांना सांस्कृतिक वारसा आहे. त्यात भारतात धनगर समाज हा अग्रक्रमाकावर आहे. धनगर समाजाकडं ज्या चालीरीती आहेत, त्या अफलातून आहेत. धनगरी ढोल हा आमचा आत्मा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्तानं 50000 ढोल वाजून विश्वविक्रम केला जाणार आहे, अशी माहिती पडळकर यांनी दिली.
एमपीएससीमध्ये अनेक पुढारी : "एमपीएससी विद्यार्थ्याचा विषय सोडलेला नाही. एमपीएससीमध्ये आत्ता अनेक पुढारी तयार झाले आहेत. विद्यार्थ्यांनी मला जर त्यांचा विषय दिला तर, मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा करेन. राज्य सरकारनं स्पर्धा परीक्षा क्लासेसचा मुद्दा गांभीर्यानं घेतला पाहिजे," अशी प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकर यांनी एमपीएससी विद्यार्थ्याच्या आंदोलनाबाबत बोलताना दिली.
हेही वाचा :