अहिल्यानगर (शिर्डी) : अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं शुक्रवारी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. साईबाबांचं बोलावणं यावेळी थोडं उशिरा आलं. पण जेव्हा जेव्हा शिर्डीला येते तेव्हा घरी आल्यासारखं वाटतं. साईंचा हात कायम माझ्या डोक्यावर आहे. श्रद्धा आणि सबुरी हा साईबाबांचा संदेश प्रत्येकानं पाळावा. त्यामुळं सगळं चांगलं होत असल्याचं अभिनेत्री शिल्पा शेट्टी म्हणाली.

बाबांनी मला खूप काही दिलं : "राणी पिंक हा माझा आवडता रंग आहे. जेव्हा शिर्डीला येते तेव्हा खास साईबाबांसाठी आवरून येते. साईंनी मला भरभरून दिलं आहे. पैसे येतात आणि जातात, पण बाबांनी मला खूप काही दिलं आहे. माझा अंधविश्वास म्हणा की विश्वास जे काय होतंय ते चांगल्यासाठी होतं व चांगलंच होईल," असा विश्वास अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं व्यक्त केला.

सहपरिवार घेतलं शनिदेवाचं दर्शन : शिर्डी साईबाबांची परमभक्त अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिनं सहपरिवार शुक्रवारी शनिशिंगणापूर येथे जाऊन शनी चौथ्यावर जात शनी मूर्तीला तेलाचा अभिषेक करत देवाचं दर्शन घेतलं. शनिदेवाच्या दर्शनानंतर सहपरिवार शिल्पा साईबाबांच्या शिर्डीला पोहचली. यावेळी अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिची आई सुनंदा शेट्टी, पती राज कुंद्रा व आपल्या दोन मुलांसह साई मंदिरात जात साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं.

शेजा आरतीला उपस्थिती लावली : यावेळी शिल्पाच्या हस्ते साईबाबांच्या समाधीवर शाल चढविण्यात आली. साई दर्शनानंतर मंदिरातून बाहेर आल्यानंतर आपल्या चाहत्यांसोबत शिल्पानं फोटोही काढले. तसेच शिल्पानं साईबाबांच्या रात्रीच्या शेजा आरतीला उपस्थिती लावली. यावेळी साईबाबा संस्थानचे उपकार्यकरी अधिकारी भीमराज दराडे यांनी शिल्पा व कुटुंबियांचा साईबाबांची शाल व साई मूर्ती देऊन सत्कार केला.
हेही वाचा - साईबाबांच्या दर्शनासाठी नीता अंबानी शिर्डीत; चाहते म्हणाले, "मॅडम रोहित शर्मा..."