मुंबई : राज्यात सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे. धरणातील पाणी साठ्यात सातत्यानं घट होत असल्यानं, मुंबईत पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत टँकर चालकांनी संप पुकारला आहे. यामुळं मुंबईत पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईतील पाण्याबाबत काय उपाययोजना केल्या आहेत? ते स्पष्ट करा आणि पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवा, अन्यथा पालिकेच्या कार्यालयावर शिवसेना धडक मोर्चा काढेल, असा इशारा आमदार आदित्य ठाकरे यांनी पालिका प्रशासनाला दिला.
मुंबईतील पाणी प्रश्न पेटणार : महायुती सरकारकडे पैसे नाहीत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुकट योजना आणल्या आहेत. कामगारांच्या पगाराचा निधी दुसरीकडं वर्ग केला जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडवला. त्याप्रमाणे भविष्यात सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पगार रखडतील, अशी धोकादायक स्थिती निर्माण झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो, अशीच परिस्थिती मुंबईत आहे. मुंबईतील चाळ, सोसायटी, बिल्डींग, रस्त्याची कामे, मॉल्स तसेच पायाभूत सुविधांची कामे यात जी पाण्याची तूट असते, ती भरून काढण्यासाठी वॉटर-टँकर असोसिएशन मुंबईत पाणीपुरवठा करते. पण टँकर असोसिएशनने आधीच संप पुकारला आहे. परिणामी मुंबईत पाणी प्रश्न पेटणायची शक्यता असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.
परिस्थितीला 'एसंशि' जबाबदार : "एसटी कर्मचारी हे जनसेवा करतात. पण त्यांचे पगार वेळेत होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी जर संपाची हाक दिली तर उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणाऱ्यांचे मोठे हाल होतील. हा सरकारने विचार केला पाहिजे," असं आदित्य ठाकरे म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला देणार असं सरकारनं सांगितलं. मात्र, राज्याच्या तिजोरीत खडखडाट असून, पैसा गेला कुठे? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित करत राज्यातील परिस्थितीला 'एसंशि' सरकार जबाबदार असल्याचा हल्लाबोल त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर केला.
हेही वाचा -