अमरावती : शहरालगत महादेव खोरीकडील रस्त्याच्या पुलाखाली एका पाईपमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याला वनविभाग आणि प्राणी मित्र संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं जंगलात हाकलून लावण्यात आलं. रविवारी एक्सप्रेस हायवेच्या वडाळीस्थित खदानाजवळ असणाऱ्या गुणवंत महाराज मंदिर परिसरात पुलाच्या मोठ्या पाईपमध्ये बिबट्या दडून बसला असल्याचे निर्देशनास आल्यानंतर नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
दगड मारून हाकलण्याचा प्रयत्न : गुणवंत महाराज मंदिरानजीक पुलाखाली काही नागरिकांना रविवारी दुपारी बिबट्या दिसला. बिबट्या हा पन्नास फुट लांबीच्या मोठ्या पाईपच्या आत बसलेला होता. त्यामुळे स्थानिक नागरिक त्याला दगड मारून हाकलण्याचा प्रयत्न करत होते. परंतू, या प्रकारामुळे बिबट्या चवताळून अंगावर येण्याची शक्यता होती. त्यामुळे नागरिकांनी याबाबतची माहिती वाईल्ड लाईफ अवेअरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेल्फेअर सोसायटीचे सदस्य अभिजीत दाणी याना दिली. त्यानंतर या माहितीवरून अभिजीत आणि निलेश कांचनपूरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
वन विभागाचं पथक आलं धावून : या घटनेची माहिती वडाळी वन विभागाला दिली. त्यानंतर तत्काळ वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे, वनपाल बाबुराव खैरकर, वनरक्षक चंद्रकांत चोले, वनरक्षक कैलास इंगळे, वन मजूर ओंकार भुरे, वाहन चालक संदीप चौधरी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाच्या पथकानं मोठ्या शिताफीनं पाईपमध्ये बसलेल्या बिबट्याला बाहेर काढलं. यानंतर वनविभागाच्या पथकानं बिबट्याला जंगलात हाकलून लावलं. महादेव खोरी आणि वडाळी जंगल परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे. नागरी वस्तीत बिबट आढळ्यास नागरिकांनी घाबरून न जाता याबाबत तत्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असं आवाहन वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांनी केलं.
हेही वाचा - समृद्धी महामार्गाजवळील कुंपणात अडकला बिबट्या; राबवलं फास्ट रेस्क्यू ऑपरेशन अन् केली सुटका