मुंबई- अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा सुरू आहे. उद्या बुधवार अधिवेशनाचे सूप वाजणार आहे. तर आज अंतिम आठवडा प्रस्ताव चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत टोलेबाजी करत विरोधकांवर जोरदार प्रहार केलाय. तर काही मिश्कील सल्लेही दिले. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून मंत्री जयकुमार गोरे यांचे एका महिलेबरोबरचे फोटो व्हायरल झाले होते, त्यावरूनही फडणवीसांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय.
गोरेंच्या विरोधातील कटात शरद पवार गटाचा हात : दरम्यान, जयकुमार गोरे यांच्या विरोधात कट कारस्थान रचलं गेलंय आणि त्यांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झालाय. या कटात एक महिला, तथाकथित पत्रकार आणि आणखी एक व्यक्ती सहभागी होती. पण दुर्दैव म्हणजे या कटात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचाही हात आहे. प्रभाकर देशमुख, खासदार सुप्रिया सुळे आणि या सभागृहाचे सदस्य रोहित पवार हे पत्रकार तुषार खरात यांच्या संपर्कात होते. हे त्यांना सतत कॉल करायचे आणि जयकुमार गोरे यांच्या विरोधात व्हिडीओ बनवल्यानंतर पत्रकार तुषार खरात हे व्हिडीओ सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना पाठवत होते, असे गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर केलाय.
राजकारण करा, पण.... : जयकुमार गोरेंचं हे प्रकरण 2017 रोजीचे होते. त्यावेळी ते आमच्या पक्षातही नव्हते. तरीसुद्धा त्यानंतर त्यांना न्यायालयाने क्लीनचिट दिली. तरीही काही लोकांनी त्यांना कट कारस्थान करून यात गोवण्याचा प्रयत्न केलाय. राजकारण करावे ते सगळेच करतात. परंतु असे करू नये, ज्याच्यामुळे वैयक्तिक आणि कुटुंबाची बदनामी होईल आणि एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. खरं तर हे सर्व कट कारस्थान होते आणि जयकुमार गोरेंना अडकवण्याचा प्रयत्न होता हे आता समोर आलंय. परंतु ज्या महिलेला काही लोकांनी पुढे केले, ज्या लोकांचा पाठिंबा होता, त्याचेही सर्व पुरावे पोलिसांना मिळाले आहेत, असं मुख्यमंत्री म्हणालेत.
त्यांच्या हिमतीला दाद... : ज्या महिलेने आपणाला जयकुमार गोरेंनी आक्षेपार्ह फोटो पाठवले, असा दावा केला होता, त्याच महिलेने नंतर पैशासाठी जयकुमार गोरेंना ब्लॅकमेल केलंय. विशेष म्हणजे एवढे होऊनही कोणीतरी आपली अन् आपल्या कुटुंबाची बदनामी होईल म्हणून हे प्रकरण मिटवलं असतं. परंतु गोरेंनी पोलिसांत रितसर तक्रार दिली. पोलिसांनी सापळा रचून त्या महिलेला पैसे घेत असताना रंगेहात पकडले. त्यानंतर या कटात एक तथाकथित यू ट्युब चॅनलचा पत्रकार, ती महिला आणि आणखी एक व्यक्तीचा समावेश असल्याचं उघड झालंय. त्यांचे कट कारस्थान समोर आलंय. परंतु जयकुमार गोरेंना एक 22 वर्षांची मुलगी आहे. हे सर्व त्यांच्यावर आरोप होत असताना ते कोणत्या परिस्थितीतून गेले असतील, याचा विचार करा. त्यांच्या मुलीला काय वाटलं असेल, याचाही विचार करा. परंतु हे सर्व असतानाही धाडसाने ते या प्रकाराला सामोरे गेले, त्याबद्दल मला जयकुमार गोरे यांना दाद द्यावीशी वाटते, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी जयकुमार गोरेंचं कौतुक केलंय.
हेही वाचा :