मुंबई : राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात सदस्यांची खासदारकी मुदत पुढील वर्षी 2 एप्रिल 2026 मध्ये समाप्त होणार आहे. मात्र, राज्यातील बदललेल्या राजकीय समिकरणांमुळे यापैकी किती जणांना पुन्हा राज्यसभेवर निवडून जाणं शक्य होईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे या सदस्यांसमोर पुन्हा निवडून जाण्याचं आव्हान उभं राहिलं आहे. विशेष म्हणजे निवृत्त होणाऱ्या सात सदस्यांमध्ये महाविकास आघाडीतील चार सदस्यांचा समावेश आहे, तर महायुतीतील 3 सदस्यांचा समावेश आहे. मात्र राज्यातील विद्यमान राजकीय बलाबलामुळे मविआचा केवळ एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे निवृत्त होणाऱ्या सदस्यांपुढं राजकीय संकट उभं राहिल्याची चर्चा आहे.

केवळ एकच सदस्य निवडून येण्याचं पाठबळ : राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता महाविकास आघाडीतील घटकपक्षांकडं निवृत्त होणारे 4 सदस्य निवडून येण्यासाठी पुरेसं संख्याबळ नाही. सध्याच्या राजकीय ताकदीनुसार मविआतील घटक पक्षांचा एकत्रितपणे केवळ एकच उमेदवार राज्यसभेत विजयी होऊ शकेल. त्यामुळे मविआचे निवृत्त होणारे सदस्य राज्यसभेत पुनरागमन करण्यासाठी राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीत कोणता मार्ग अवलंबतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल.

हे खासदार 2 एप्रिल 2026 ला होणार निवृत्त : 2 एप्रिल 2026 ला निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रा. डॉ. फौजिया खान, काँग्रेसच्या रजनी पाटील आणि शिवसेना उबाठाच्या प्रियांका चतुर्वेदी यांचा समावेश आहे. तर महायुतीमधील भाजपाच्या धैर्यशील पाटील, भागवत कराड आणि रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे रामदास आठवले यांचा समावेश आहे. यापैकी रामदास आठवले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. या सदस्यांचा कालावधी 6 वर्षांचा असतो. यातील दोन तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. त्यामुळे या सभागृहाला स्थायी सभागृह असं संबोधलं जाते.
महाराष्ट्र विधानसभेतील सध्याचे पक्षीय बलाबल :
भाजपा - 132,
शिवसेना - 57,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - 41,
शिवसेना उबाठा - 20,
काँग्रेस - 16,
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष - 10
सध्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले उमेदवार व त्यांच्या निवृत्तीची तारीख :
1) शरद पवार - राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार - 2 एप्रिल 2026
2) प्रा. डॉ. फौजिया खान - राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार - 2 एप्रिल 2026
3) प्रियांका चतुर्वेदी - शिवसेना उबाठा - 2 एप्रिल 20264) रजनी पाटील - कॉंग्रेस - 2 एप्रिल 2026
5) डॉ. भागवत कराड - भाजपा - 2 एप्रिल 2026
6) रामदास आठवले - रिपब्लिकन पक्ष (आठवले) - 2 एप्रिल 2026
7) धैर्यशील पाटील - भाजपा - 2 एप्रिल 2026
8) डॉ अनिल बोंडे - भाजपा - 4 जुलै 2028
9) धनंजय महाडिक - भाजपा - 4 जुलै 2028
10) नितीन जाधव पाटील - भाजपा - 4 जुलै 2028
11) संजय राऊत - शिवसेना उबाठा - 4 जुलै 2028
12) इम्रान प्रतापगडी - काँग्रेस - 4 जुलै 2028
13) सुनेत्रा अजित पवार - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - 4 जुलै 2028
14) प्रफुल्ल पटेल - राष्ट्रवादी काँग्रेस - 2 एप्रिल 2030
15) मिलींद देवरा - शिवसेना - 2 एप्रिल 2030
16) डॉ. अजित गोपछडे - भाजपा - 2 एप्रिल 2030
17) अशोक चव्हाण - भाजपा - 2 एप्रिल 2030
18) चंद्रकांत हंडोरे - काँग्रेस - 2 एप्रिल 2030
19) मेधा कुलकर्णी - 2 एप्रिल 2030
महायुतीकडून मविआचे आमदार फोडण्याचा प्रयत्न : राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीत राज्यसभेवर आता मविआतर्फे केवळ एक उमेदवार विजयी होऊ शकेल. मविआच्या उमेदवारांना राजकीय मदत मिळण्याची अजिबात शक्यता नाही. उलट महायुतीकडून मविआचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला जाईल, ही शक्यता नाकारता येत नाही. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये शरद पवार हे सर्वात ज्येष्ठ सदस्य असल्यानं त्यांच्याबाबत विचार केला जाण्याची शक्यता आहे. मात्र दुसरा सदस्य निवडून येणं अशक्य आहे. जर शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर न जाण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्याऐवजी कोणता उमेदवार असेल, हे पाहावं लागेल. विधानसभेतील ताकदीनुसार मविआतील शिवसेना उबाठाकडं सर्वाधिक 20 आमदार आहेत, काँग्रेसकडं 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शप पक्षाकडं केवळ 10 आमदारांची ताकद आहे. त्यामुळे या तीन्ही पक्षांमध्ये परस्पर समन्वयानं नेमका काय निर्णय होईल, हे देखील महत्त्वाचं ठरेल. मविआकडं असलेली मतं कायम ठेवणं त्यांना एक उमेदवार निवडून आणण्यासाठी देखील गरजेचं आहे, असं मत राजकीय विश्लेषक संजीव साबडे यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा :