नागपूर : शुक्रवारी रात्री नागपूरच्या उमरेड एमआयडीसी येथील एमएमपी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीमध्ये स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीत कामगार होरपळले होते. त्यापैकी पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच नागपूरचे पालकमंत्री व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एमएमपी इंडस्ट्री लिमिटेड कंपनीl जाऊन घटनेचा आढावा घेतला. प्रत्येक मृताच्या वारसाला 60 लाख रुपये मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यातील 55 लाख रुपये कंपनी देणार आहे तर पाच लाख रुपये सरकार देणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. घटनेची संपूर्ण चौकशी पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी, इंडस्ट्री प्रशास करेल. चौकशी अंती जो गुन्हा असेल त्या गुन्ह्यावरील कारवाई करण्यात येईल असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.
जखमींना ३० लाखाची मदत, वारसांना नोकरी : या स्फोटात जे कामगार जखमी झाले आहेत, जे यानंतर काम करू शकणार नाहीत, त्यांना ही 30 लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. मृतांच्या परिवारातीला व्यक्तीला आणि जे यात गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मृतकांमध्ये निखिल नेहारे (24) अभिषेक जांगड (20), निखिल शेंडे (25) पियुष दुर्गे (21) आणि सचिन मेश्राम (26) यांचा समावेश आहे. हे सर्व कामगार उमरेड येथील रहिवासी आहेत.
घटनास्थळाचा घेतला आढावा : उमरेडच्या एमआयडीसीत असलेल्या एमएमपी इंडस्ट्रीज लि. कंपनीत झालेल्या स्फोटानंतर आज घटनास्थळी महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली. ही संपूर्ण घटना कशी घडली त्याची सपूर्ण माहिती प्रशासन आणि कंपनी मालक यांच्याकडून जाणून घेतली आणि या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आणि जे जखमी आहेत त्यांना काही मदत करता येईल यावर चर्चा केली.
...तर जखमींना एअर ॲम्बुलन्सनं मुंबईत आणू : कंपनीचे मालकही घटनास्थळी उपस्थिती होते. त्यांच्याशी चर्चा केली. आम्ही परिवारांना मदत द्यावी अशी सर्वांनी चर्चा केली. जे जखमी आहेत त्यांवर औषधोपचार करायचे आहेत ते राज्य सरकार करेल. जखमी कामगारांना जर गरज भासली तर लगेच एअर ॲम्बुलन्सने ठाणे जिल्ह्यातील ऐरोली येथे उपचारासाठी दाखल करू असं बावनकुळे यांनी सांगितलं.
हेही वाचा...
नागपूरच्या उमरेड एमआयडीसीतील कंपनीत स्फोटानंतर आग, पाच कामगारांचा मृत्यू