बीड : पाचवीच्या वर्गातील मुलीचा तासाभरातच दोन वेळा विवाह लावल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. तक्रारीची कुणकुण लागताच पहिला नवरदेव पळून गेला, तर दुसऱ्याला नवरी घेऊन जात असताना पकडण्यात आलं. रात्री 09 वाजता दोन नवरदेवांसह त्यांचे नातेवाईक आणि मुलीच्या आई-वडिलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी दिली.
पाचवी पास झाली पीडिता अन् लावलं लग्न : बीड शहरातील अवघ्या 13 वर्षांची पीडिता नुकतीच पाचवी पास झाली. सहावीच्या वर्गात जाण्यासाठी ती तयार होती. तिला वडील आणि सावत्रआई आहे. आधीच दोन विवाहासह दोन मुलांचा बाप असलेल्या सुलेमान पठाण (25, रा. बेलखंडी पाटोदा, ता. बीड) याच्यासोबत लग्न जुळवलं. गुरुवारी सकाळी 08 वाजताच शाहूनगर भागातील घरात विवाह लावला. त्याचे फोटोही काढले, परंतु सुलेमानच्या पत्नीनं तक्रार केली. याची कुणकुण सुलेमानला लागली. त्यामुळे त्यानं आपल्या बहिणीच्या गावच्या आसेफ शेख याला तिथं पाठवलं आणि स्वतः पळून गेला. त्यानंतर मुलीचा विवाह आसेफबरोबर झाला. त्या विवाहाचे फोटोही काढले. या प्रकरणात कोणाला संशय येऊ नये, म्हणून आसेफ हा नवरीला घेऊन जात होता. ही माहिती सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांना मिळाली. त्यांनी लगेच पोलीस यंत्रणेशी संपर्क साधून त्यांना बार्शी रोडवर पकडलं. सुलेमानला पहिल्या बायकोपासून एक मुलगी आहे. त्यांच्यात वाद झाले असून, न्यायालयात प्रकरण सुरू आहे. याच प्रकरणात त्याला अटक वॉरंट निघाल्याचं पत्नीनं सांगितलं.
दोन बायका असतानाही तिसऱ्या वेळी चिमुकलीशी लग्न : दुसरी पत्नीही त्याच्या नात्यातील असून, तिला मुलगा आहे. अगोदर दोन बायका असतानाही सुलेमान यानं अवघ्या 13 वर्षांच्या मुलीसोबत तिसरा विवाह केल्याचं यावेळी सांगण्यात आलं. या प्रकरणात सुलेमान पठाण आणि आसेफ शेख यांच्यासह चिमुकलीचे आई वडील आणि दोन्ही मुलांच्या नातेवाइकांविरोधात तक्रार दिली आहे.
चिमुकलीच्या आई वडिलांसह नवरदेवाच्या नातेवाईकांवरही गुन्हा : "बीडमधील शिवाजीनगर परिसरात एका 13 वर्षीय चिमुकलीचा बालविवाह लावून देण्यात येत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यावरुन आम्ही पोलीस पथक पाठवून चौकशी केली असता, नवरदेव पळून जात होता. त्याला पाठलाग करुन पकडलं असून ताब्यात घेण्यात आलं आहे. चिमुकलीच्या आई वडिलांसह नवरदेवांच्या नातेवाईकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे," अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी दिली.
हेही वाचा :