मुंबई - राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्वाची बातमी समोर येत आहे. एसटीतील कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारावर ५३ टक्के महागाई भत्ता देण्यात येणार आहे. जून २०२५ पासून कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर ४६ टक्के ऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता देण्यात येईल, अशी महत्वाची आणि मोठी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे एसटी महामंडळाच्या विविध संघटना आणि राज्य शासनाची बैठक पार पडली. यावेळी शिंदेंनी हा महत्वाचा निर्णय घेतला.
कर्मचाऱ्यांना १ कोटीचे अपघाती विमा कवच - महत्वाचे म्हणजे राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी एक निवडण्याचा पर्याय असणार आहे. त्यामुळं कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एसटीचा मोफत प्रवास करता येणार आहे. म्हणजे पूर्वी नऊ महिन्याचा पास मिळायचा, त्याऐवजी आता १२ महिन्यासाठी एसटीचा मोफत प्रवास करता येणार आहे. हा निर्णयही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केला.
निवृत्त कर्मचाऱ्यांना एसटीतून मोफत प्रवास - निवृत्त कर्मचाऱ्याला आणि त्यांच्या पत्नीला वर्षभर एसटीतून मोफत प्रवास करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. याचा लाभ सुमारे ३५ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना स्टेट बँकेमार्फत अपघाती विमा कवच लागू करण्याबाबत बँकेशी सामंजस्य करार करण्यात आलाय. तसेच एसटीची उत्पन्न वाढ, इंधन बचत, यावरही बैठकीत चर्चा झाली. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांचे वेतन खाते स्टेट बँक ऑफ इंडिया येथे असावे, कर्मचाऱ्यांना विमा कवच लागू करण्याचा निर्णय, वैयक्तिक अपघातात निधन झाल्यास १ कोटी, अंशतः अपंगत्व आल्यास ८० लाख, पुर्णतः अपंगत्व आल्यास १ कोटी रुपयांपर्यंत विमा रक्कम दिले जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.