बीड : जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षण भरतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष सादिक इनामदार यांनी केला आहे. याबाबत त्यांनी राज्याच्या शिक्षण मंत्र्याकडं तक्रार केली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी आणि माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सादिक इनामदार यांनी केली आहे. नागपूरमध्ये शिक्षक भरती प्रकरणी चौकशी सुरू आहे. यासोबत बीड जिल्ह्यातही शिक्षक भरतीमध्ये खासगी संस्थाचालक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमतानं कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं पाहायला मिळत आहे, असा आरोप त्यांनी केलाय.
सादिक इनामदार यांना जीवे मारण्याची धमकी : "मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. माझ्या जीवाला धोका आहे. मला काही बरे वाईट झाल्यास जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी भगवान फुलारी आणि ज्या खासगी संस्थेत भ्रष्टाचार झाला. हे या घटनेस जबाबदार राहतील," असं सादिक इनामदार यांनी म्हटलय.

पदाचा गैरवापर करत केली शासनाची फसवणूक : उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी शिक्षण अधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांना शासनाच्या नियमानुसार शासनाच्या अधीन राहून शिक्षक भरती संदर्भात आपल्या स्तरावर निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्यांनी असं न करता पदाचा गैरवापर करून शासनाची फसवणूक करत करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. संस्था चालकांना कोट्यवधी रुपयांचे थकीत वेतन वितरित करून शिक्षक भरती घोटाळा आणि खासगी शिक्षण संस्थेमधून विनाअनुदानित शिक्षकांना देयके दिली आहेत, असाही आरोप त्यांनी केलाय.
माहिती देण्यास दिला नकार : "माहिती अधिकारामध्ये मागवलेली माहिती १४ मे ला कार्यालयात देतो, अशी माहिती मला कार्यालयातील लिपीक यांनी फोनवरून दिली. यानंतर मी कार्यालयात गेल्यावर मला माहिती अधिकारामध्ये मागवलेली माहिती देण्यास नकार दिला. यावेळी लिपीक यांनी सांगितलं की, शिक्षण अधिकारी भगवान फुलारी यांनी सादिक इनामदार यांना माहिती देऊ नका असं सांगितलं आहे," असं सादिक इनामदार यांनी सांगितलं.
शिक्षण विभागानं दिले अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश : बीड जिल्ह्यातही प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षक भरतीत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचे आरोप होत आहेत. याबाबत भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष सादिक इनामदार यांनी राज्याच्या शिक्षण मंत्र्यांकडं तक्रार केली होती. यावरून प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांच्या प्राथमिक चौकशीचे आदेश राज्याच्या शिक्षण विभागानं दिले आहेत.
बोगस शिक्षक भरतीचा होणार भांडाफोड : राज्यात सध्या शिक्षक भरती घोटाळा चर्चेचा विषय बनला आहे. नागपूरमध्ये देखील शिक्षक भरती प्रकरणी चौकशी सुरु झाली आहे. बीड जिल्ह्यातही शिक्षक भरतीमध्ये खासगी शिक्षण संस्था चालक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी संगनमत करुन कोट्यवधींचा घोटाळा केल्याच्या तक्रारी आहेत. पवित्र पोर्टलमध्ये खेळ करत शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आणि त्या नियुक्त्यांना शिक्षण विभागाने मान्यताही दिली अशा तक्रारी आहेत. विशेष म्हणजे यासंदर्भातील कोणतीच माहिती दिली जात नव्हती. एवढंच नाही तर, माहिती अधिकारात देखील माहिती द्यायला शिक्षण विभाग तयार नाही. या संपूर्ण प्रकरणात शेकडो कोटींची उलाढाल झाल्याच्या तक्रारी होत्या. या संदर्भात भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष सादिक इनामदार यांनी राज्याच्या शिक्षण मंत्र्यांकडं तक्रार केली होती. त्यात प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी 500 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचं म्हटलं होतं. यावर शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना चौकशीचे निर्देश दिले होते. त्यानुसार शिक्षण विभागाने आता राज्याच्या शिक्षण आयुक्तांना या प्रकरणात प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातही बोगस शिक्षक भरतीचा भांडाफोड होणार असं सध्या तरी दिसतय.
हेही वाचा :