शिर्डी: शिर्डीच्या साईबाबा समाधीचं दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भक्त देशभरातून शिर्डीत येतात. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांच्या सहली देखील शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतात. मात्र, बुधवारी एका अनोख्या सहलीनं सर्वांचं लक्ष वेधलं. गोंदिया जिल्ह्यातील नक्षल प्रभावित भागातील 40 विद्यार्थ्यांनी शिर्डीला भेट देत साईंच्या समाधीचं दर्शन घेतलं.
आपला महाराष्ट्र दर्शन योजना : गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी बहुल नक्षल प्रभावित भागातील जनतेच्या विकासाकरता गोंदिया जिल्हा पोलीस दलामार्फत "दादालोरा खिडकी" योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या संकल्पनेतून नक्षलग्रस्त भागातील 14 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी "आपला महाराष्ट्र दर्शन योजना" राबवली जाते. गोंदिया पोलीस प्रशासन आणि आदिवासी विकास प्रकल्प विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी-विद्यार्थिनींची सहल घडवण्यात येते. महाराष्ट्र , छत्तीसगड, मध्यप्रदेश, सीमेवरील नक्षलग्रस्त भागातील जे विद्यार्थी आदिवासी शाळेत शिक्षण घेतात. या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी महाराष्ट्राची प्रगती, ऐतिहासिक, शैक्षणिक, औद्योगिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचं दर्शन घडावं यासाठी विविध ठिकाणी धार्मिक स्थळांना भेटी दिल्या जात असल्याची माहिती, सहलीचे आयोजक पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारे यांनी दिली.
पाच दिवसांची सहल : शिर्डी साईबाबांच्या समाधीच्या दर्शनानंतर ही सहल शनिशिंगणापूर, छत्रपती संभाजीनगर येथील दौलताबाद किल्ला, खुलताबाद येथील मारुतीचं दर्शन, बीबी का मकबरा, वेरूळ लेणी, अजिंठा, यानंतर शेगाव गजानन महाराज मंदिरालाही भेट देणार आहेत. अशी पाच दिवसांची ही सहल आयोजित करण्यात असल्याची माहिती श्रीकांत हत्तीमारे यांनी दिली.
विद्यार्थ्यांनी केली मध्यान्ह आरती : गोंदिया जिल्ह्यातील नक्षल प्रभावित भागातील तब्बल 40 विद्यार्थ्यांची सहल पहिल्यांदाच शिर्डीला आल्यानं या विद्यार्थ्यांना साई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले, साई मंदिर सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी आणि साईबाबांचे समकालीन भक्त काशीराम शिंपी (मिराणे) यांचे वंशज नितीन मिराणे यांनी साईबाबांविषयी माहिती दिली. दरम्यान साईबाबांची मध्यान्ह आरती सुरू असल्यानं या सर्व विद्यार्थ्यांनी संस्थानच्या मंदिर परिसरातील मिटिंग हॉलमध्ये बसून साईबाबांची मध्यान्ह आरती केलीय. आरतीनंतर या सर्व विद्यार्थ्यांना चहापाणी संस्थानच्या वतीनं देण्यात आलं. तसंच व्हीव्हीआयपी भाविकांना ज्या पद्धतीने साईबाबांच्या समाधीचं दर्शन दिलं जातं. तसंच दर्शन या विद्यार्थ्यांना देण्यात आल्यानं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकत होता.
विविध भाषिक भाविक भेटले : "आम्ही पहिल्यांदाच शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलोय. शिर्डीत कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. सर्वच धर्माचे लोक येथे येतात आणि साईंच्या समाधीचं दर्शन घेतात. मी आज साईंबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानं मनाला खूप आनंद झाला असून विविध भाषिक भाविक मला येथे पाहायला मिळाले. ज्या लोकांना माझी भाषा समजत नाही आणि त्या लोकांची मला भाषा कळत नाही अशा अनेक भाविकांना भेटण्याचा अनोखा अनुभव आम्हाला मिळाला. ही सहल आमच्या जीवनात प्रेरणादायी ठरेल". असा अनुभव विद्यार्थिनी विभा हिनं सांगितला.
हेही वाचा -