सातारा - सातारा तालुक्यातील निकमवाडी, आव्हाडवाडी गावांच्या शिवारात चरणाऱ्या २४ मेंढ्यांचा पोट फुगल्यानं मृत्यू झाला आहे. मेंढ्यांनी शिवारातील हिवरा वृक्षाच्या शेंगा खाल्ल्यानं विषबाधा होऊन ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत फलटण तालुक्यातील मेंढपाळाचं लाखो रूपयांच नुकसान झालं आहे.
पोट फुगल्यानं मेंढ्यांचा मृत्यू : फलटण तालुक्यातील आदर्की बुद्रुक गावचे मेंढपाळ नाना सूळ हे मेंढ्या चारण्यासाठी सातारा तालुक्यातील कोंडवे गावात आले आहेत. कोंडवे गावात त्यांचा तळ आहे. सोमवारी मेंढ्या चारण्यासाठी ते आव्हाडवाडी, निकमवाडी गावच्या शिवारात गेले होते. सोमवारी सायंकाळी निकमवाडी गावच्या शिवारात हिवर वृक्षाच्या शेंगा खाल्ल्यानं मेंढ्यांचं पोट फुगून २४ मेंढ्यांचा मृत्यू झाला.
पशुसंवर्धन अधिकारी घटनास्थळी दाखल : सातारा जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांना मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची माहिती देण्यात आली. त्यांनी सातारा तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्याची सूचना केली. त्यानंतर रात्री उशिरा पशुसंवर्धन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी मेंढपाळ नाना सूळ यांनी घडलेल्या घटनेची माहिती दिली.
शासनानं अर्थिक मदत देण्याची मागणी : शिवारात चरताना विषारी वनस्पती खाल्ल्यानं अनेकदा मेंढपाळांच्या पशुधनाचा मृत्यू होतो. त्यात त्यांना मोठा अर्थिक फटका बसतो. अशाच घटनेत मेंढपाळाच्या मेंढ्या मृत्युमुखी पडल्यानं त्यांचं मोठं अर्थिक नुकसान झालं आहे. मेंढपाळ नाना सूळ यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्यराव गायकवाड यांनी केली आहे.
हेही वाचा - 'या' तारखेला झाला होता क्लोनिंगद्वारे डॉली मेंढीचा जन्म, वाचा सविस्तर