नागपूर : नागपूरला अमली पदार्थांचा विळखा आणखीचं घट्ट होताना दिसतोय. नागपूरच्या तरुणाईला या नशेखोरीच्या जीवघेण्या जाळ्यात ओढणाऱ्यांचे पाळेमुळे खोदून काढण्यासाठी, नागपूरच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत गेल्या २० दिवसात १ कोटी ४३ लाख १२ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे या वीस दिवसामध्ये १ किलो २५८ ग्रॅम एमडी ड्रग्सचा (मेफेड्रोन) साठा जप्त करण्यात आला असून, १६७ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती, पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी दिली.
गुन्हेगार घेत आहेत गैरफायदा : देशाच्या हृदयस्थानी वसलेल्या नागपूर शहराला भौगोलिकदृष्टीनं फार महत्व आहे. नागपूरमार्गे देशाच्या चहू दिशेने भारतात प्रवास करता येतो. सोयीस्कर दळण-वळणाची सोय विकासासाठी नव्हे, तर अमली पदार्थांच्या अवैध वाहतुकसाठी गुन्हेगार करत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. शहरातील वाढती बेरोजगारी, जीवनशैलीतील बदल आणि आजच्या तरुणांचा व्यसनधीनतेकडे वाढलेला झुकाव या साऱ्यांचा गैरफायदा अमली पदार्थांची तस्करी करत असलेले गुन्हेगार घेत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
४ महिन्यात केवळ ५८ लाखांचे अमली पदार्थ जप्त : अवघ्या २०दिवसाच्या कालावधी अंमली पदार्थ विरोधी पथकाने १ कोटी ४३ लाख १२ हजारांचं अमली पदार्थ जप्त केलं असलं तरी, गेल्या चार महिन्यात झालेल्या कारवाईचे आकडे हे फारसे समाधानकारक नाहीत. गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत अमली पदार्थ विरोधी पथकानं ५८ लाख ४४ हजार रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं आहे. यात केवळ ३८० ग्रॅम (एमडी) मेफेड्रोन, अफीम आणि गांजाचा समावेश असून, १२५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर मे महिन्याच्या २० दिवसात झालेली कारवाई चार महिन्यातील कारवाईच्या दुप्पटी पेक्षा ही अधिक आहे.
पानमसाल्यातून ते इंजेक्शनपर्यंत पोहोचलेले व्यसन : गेल्या काही वर्षांत (एमडी) ‘मेफेड्रोन’ ड्रग्जचा वापर झपाट्यानं वाढला आहे. मेफेड्रोन ड्रग्जचे सेवन अनेकदा पानमसाल्यासारख्या पदार्थांत मिसळून केले जात आहे. तसेच सुगंधी तंबाखूमिश्रित पानमसाल्यात ड्रग्ज पावडर मिसळून तरुण वर्ग सहजपणे सेवन करत आहेत. त्यासोबतच या ड्रग्जचे सेवन आता इंजेक्शनद्वारे थेट रक्तप्रवाहात केले जात असल्याचं देखील निदर्शनास आलंय आणि ते अधिक धोकादायक ठरत आहे.
ड्रग्ज पुरवठ्याचे गुप्त जाळे : राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेश येथून अफीम, तर आंध्रप्रदेश, तेलंगणा, ओडिशा आणि ईशान्य राज्यातून गांजा नागपूरमध्ये आणला जातो. येथे त्याची विल्हेवाट लावून इतर राज्यांमध्ये पुन्हा वितरित केला जातो. नागपूर हे ड्रग्स तस्करीचे एक प्रमुख ‘ट्रांजिट पॉईंट’ बनले आहे.
धडक कारवाई : अमली पदार्थांच्या वाढता प्रभाव रोखण्यासाठी नागपूर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरभरात पथके सक्रिय करण्यात आली आहेत, गुप्त माहिती मिळताच सापळा रचून ड्रग्ज विक्रेत्यांना अटक केली जात आहे.
पोलिसांचं नागरिकांना आवाहन : नागपूर शहर पोलीस विभागाने ड्रग्ज तस्करांच्या विरोधात सुरू केलेली मोहीम भविष्यात अधिक व्यापक केली जाणार असून, ड्रग्ज विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत. तरुणांचं भवितव्य अंधकारमय होण्याआधीच मुळापासून नष्ट करण्याचा निर्धार नागपूर पोलिसांनी केलाय. त्यासाठी पोलिसांनी १९३३ हा हेल्पलाईन क्रमांक जारी केलाय. अमली पदार्थांची तस्करी आणि त्या संबंधातील माहिती नागपूरकर जनता नॅशनल नार्कोटिक्स हेल्पलाइन क्रमांक १९३३ वर देऊ शकतात. याशिवाय व्यसनाधीन व्यक्तींची, त्यांच्या कुटुंबीयांना आणि व्यापक दृष्टिकोनातून समाजाची मदत करण्यासाठी आठवड्याचे सातही दिवस आणि २४ तास सुरू राहणारी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी १८००११००३१ या क्रमांकावर नागरिक संपर्क करू शकतात.
हेही वाचा -