नागपूर : गेल्या दोन दिवसांपासून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक नागपुरात तळ ठोकून आहेत. त्यांनी दोन दिवसांत वन विभागाच्या मुख्यालयामध्ये अनेक बैठका घेतल्या आहेत. वन विभागात काय सुरू आहे?, काय अडचणी आहेत?, उपाय कोणते?, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न म्हणून गेले दोन दिवस त्यांनी आढावा बैठक घेतल्या आहेत. दरम्यान, "राज्यात आजच्या घडीला ४४६ वाघ आहेत. बफर झोनपेक्षा कोर झोनमध्ये वाघ जास्त असून चंद्रपूर जिल्ह्यात वाघांचा प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या तीन महिन्यांत राज्यात १९ वाघांचा मृत्यू झाला असून ४ वाघांची शिकार झाली आहे. तर, काही वाघांचा उपासमारीमुळे मृत्यू झाला आहे," अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. तसंच, "गुजरातच्या जामनगर इथं अंबानी कुटुंबानं सुरू केलेल्या वनताराप्रमाणे महाराष्ट्रात ही सूर्यतारा अभयारण्य सुरू करण्यासाठी एक पत्र अनंत अंबानी यांना दिलं आहे. त्यासाठी आवश्यक जागेची निवड करण्यात आली आहे, असंही वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं.
रिकाम्या जागेवर फळबागा लावा : "केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये वन विभागाकडून नाहक अडचणी निर्माण होऊ नयेत, याबद्दल स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. वन विभागाच्या वेगवेगळ्या उपक्रमातून महसूल वाढवण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठीचे वन विकास महामंडळानं त्यांच्याकडं असलेल्या जागेवर बांबू लागवड करावी. यासह मराठवाड्यात मोसंबी, विदर्भामध्ये संत्रा, नाशिक भागात द्राक्ष, पश्चिम महाराष्ट्रात डाळिंब या सारखी फळझाडे लाऊन फळांच्या ज्यूसच्या निर्मितीतून वन विभागाचे उत्पन्न वाढावे अशी अपेक्षा आहे," असं वनमंत्री गणेश नाईक म्हणाले.
वनविभाग सुरू करणार फर्निचर मॉल : "माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं स्वप्न होते की, वन विभागाच्या लाकडातून दर्जेदार फर्निचर बनवण्याचा मोठा कारखाना नागपूर इथं सुरू व्हावा. मुनगंटीवार यांचं स्वप्न पुढं नेण्याचं काम आम्ही करणार आहोत. पुढील सात महिन्यात दर महिन्याला दहा कोटी म्हणजे एकूण ७० कोटी गुंतवून राज्यात ठिकठिकाणी फर्निचर निर्मिती कारखानं सुरू केले जाणार आहेत," अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. पुढं ते म्हणाले की, "फक्त विदर्भातचं नाही तर, राज्यातील प्रत्येक भागात वनातील लाकडातून फर्निचर कारखाने उभारू."
वन्य प्राणी जंगलाबाहेर जाऊ नयेत यासाठी... : "वन्य प्राणी वन क्षेत्रातचं थांबावेत म्हणून वनातील कोर भागांमध्ये काही फळ झाडं लावले जाणार आहेत. तृणभक्षी प्राण्यांची गरज भागविणं आणि त्या तृणभक्षी प्राण्यांच्या माध्यमातून वाघ, बिबट्या यासारख्या प्राण्यांची गरज भागवून प्राणी वन क्षेत्राच्या बाहेर येऊन हल्ले करणार नाहीत, तसंच इतर समस्या निर्माण करणार नाहीत असं उपक्रम राबविणार आहे," अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.
समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला झाडे लावू : "वन विभागाकडं जी दर्जाहीन जमीन आहे. तिथं सौर ऊर्जा पॅनेल लावून सौर ऊर्जा निर्माण केली जाईल. त्यातून वन विभागाचं उत्पन्न वाढवण्याची योजना आहे. वन विभागाच्या गाड्या खराब झाल्या आहेत. त्यामुळं नव्या गाड्या घेण गरजेच आहे. जिथं आवश्यक आहे तिथं नवं शस्त्र देऊ. समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला झाडं लावण्याचं काम सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून केलं जाणार आहे," असंही वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं.
मेळघाटात एकही वणवा भडकला नाही : पुढे वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, "मेळघाटातील जंगलात वणवा लागण्याची यंदा एक ही घटना घडली नाही. गरज पडली तर, हेलिकॉप्टर मदतीने वणवा विझवण्यात यावेत असे निर्देश दिले आहेत. सुमारे ५० लाख रुपयांचा ड्रोन वणवे विझवण्यासाठी घेण्याचं ठरवलं आहे. तसंच, आधी शिकारी जंगल भागात रहायचे आता ते शहरात राहत आहेत. राजुरामध्ये जे शिकारीचे प्रकार समोर आलं, त्या शिकऱ्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचं तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यात प्रगती होऊन चार्जशीट दाखल केली जाईल", असंही वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं.
हेही वाचा :
- नवीन वाळू धोरणामुळं सर्वसामान्यांना कसा होणार फायदा? अर्ज करण्याची प्रक्रिया काय? वाचा सविस्तर...
- स्वेच्छेने घरातून पळून गेलेल्या मुलीच्या तक्रारीवरून मुलाविरोधात बलात्कार अन् पोक्सोचा गुन्हा, चार वर्षांनंतर कोर्टाकडून जामीन मंजूर
- कोयनेच्या बॅक वॉटर परिसरातील लाखो वटवाघळांमुळं स्थानिक हैराण; मात्र वटवाघळं 'असा' राखतात पर्यावरणीय समतोल